अखेर नवीन कोरोना टेस्टिंग सेंटरची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:37+5:302021-04-13T04:08:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एकाच परिसरात कोरोना लसीकरण तसेच कोरोनाची आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन टेस्ट केली ...

अखेर नवीन कोरोना टेस्टिंग सेंटरची तयारी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एकाच परिसरात कोरोना लसीकरण तसेच कोरोनाची आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन टेस्ट केली जात होती. या गंभीर समस्येकडे ‘लोकमत’ने सर्वप्रथम ७ एप्रिल रोजीच्या अंकात लक्ष वेधले. ‘अरे देवा! कोविड चाचणी अन् लसीकरण एकाच छताखाली’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करीत, नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तालुका आपत्ती समितीला अवगत केले. नागरिकांनीही यावर वारंवार नाराजी व्यक्त केली. अखेरीस आता नवीन ठिकाणी कोरोना टेस्टिंग सेंटरसाठी युद्धपातळीवर तयारी केली जात आहे.
ज्या परिसरात उमरेड येथील कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे, त्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुलालगतच ही व्यवस्था केली जात आहे. टेस्टिंगसाठी पेंडाॅलचे छत उभे करण्याचे काम सुरू झाले असून, येत्या काही दिवसातच याठिकाणी कोरोना टेस्टिंगचे कार्य सुरू होणार आहे. उशिरा का होईना, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने योग्य पाऊल उचलल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार गिरीश व्यास यांनी उमरेड परिसरातील कोविड परिस्थितीचा आढावा घेत, आपल्या विकास निधीतून कोरोना कार्यात सहभागी असणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, ऑक्सिमीटर, बेड्स आदी सुविधा देणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, दिलीप सोनटक्के उपस्थित होते.
....
पाचगाव केंद्रात सर्वाधिक लसीकरण
उमरेड तालुक्यात शनिवार (दि. १०) पर्यंत ३० हजार ८७७ नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे. सर्वाधिक लसीकरण पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले आहे. याठिकाणी १०,४०९ जणांनी लसीकरण केले. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात ८,५८५, बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३,६९२, सिर्सी २,६३७ आणि मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ४,६५० जणांनी लसीकरण केले.
लसीकरणाबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांना विचारणा केली असता, सोमवारी (दि. १२) लसींचे डोस उपलब्ध होण्याची शक्यता असून, डोस मिळाल्यानंतरच नियोजन आखले जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.