निकालांच्या गाडीने अखेर घेतला वेग
By Admin | Updated: August 9, 2015 02:51 IST2015-08-09T02:51:31+5:302015-08-09T02:51:31+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे.

निकालांच्या गाडीने अखेर घेतला वेग
नागपूर विद्यापीठ : उन्हाळी परीक्षांचे तीन चतुर्थांश निकाल घोषित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. यंदा निकालप्रणाली पूर्णत: विस्कटल्याचे दिसून आले. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकालांच्या गाडीने थोडाफार वेग घेतला आहे. शुक्रवार व शनिवारी सुमारे ९० निकाल घोषित करण्यात आले. आतापर्यंत सुमारे तीन चतुर्थांश निकाल लागले आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा संपून अनेक आठवडे झाले तरी परीक्षांचे निकाल लागले नव्हते. निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परीक्षा विभाग प्राध्यापकांकडे बोट दाखवत आहे तर प्राध्यापक विद्यापीठाच्या धोरणांना दोषी ठरवत आहे. अशास्थितीत नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे होत आहे.अनेक परीक्षा होऊन तर दोन महिने उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांकडून निर्माण होणारा दबाव लक्षात घेता विद्यापीठाने बीए, बीकॉम व बीएस्सीचे अंतिम वर्षांचे निकाल जाहीर केले. परंतु इतर निकालांचे काय अशी सातत्याने विचारणा होत आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतु निकालच लागले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये उत्साह नाही व त्यामुळे अनेक ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये उपस्थिती रोडावल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी निकाल कधी लागणार याची यादीदेखील संकेतस्थळावर टाकण्यात आली होती. परंतु त्याचीदेखील ‘डेडलाईन’ चुकल्याचे दिसून आले. परंतु या आठवड्यापासून निकालांचे प्रमाण वाढीस लागले आहे. शुक्रवार व शनिवार मिळून सुमारे ९० परीक्षांचे निकाल जाहीर झाले. यात मोठी विद्यार्थीसंख्या असलेल्या बीए अभ्यासक्रमाच्या निकालांचादेखील समावेश आहे. (प्रतिनिधी)