कारागृहातील तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: July 28, 2015 03:48 IST2015-07-28T03:48:02+5:302015-07-28T03:48:02+5:30
याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे नागपूरच्या मध्यवर्ती

कारागृहातील तयारी अंतिम टप्प्यात
नागपूर : याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सकाळी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहातील तयारीची पाहणी करून संबंधितांची प्रदीर्घ बैठक घेतली. नेहमीप्रमाणे सोमवारी सुद्धा त्यांनी पत्रकारांना टाळले.
फाशी टाळण्यासाठी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर करून सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. दयेचा अर्ज आणि याचिका या दोन्हीवर आज सोमवारी सुनावणी होणार, असे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी करण्याचे निश्चित केले. तर दयेच्या अर्जाबाबतची स्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे साऱ्यांच्या नजरा आता मंगळवारकडे लागल्या आहेत. दरम्यान, गुरुदासपूरला झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना अधिकच कडक केल्या. कारागृहात जाणारे नागरिक, वकील आणि पत्रकारच नव्हे तर पोलिसांचीही आज रीतसर तपासणी केली जात होती. खाजगी वाहनात बसून असलेल्या गणवेशधारी पोलिसांनाही त्यांचे ओळखपत्र मागतिले जात होते. त्याची खात्री पटल्यानंतरच कारागृह परिसरात प्रवेश दिला जात होता. (प्रतिनिधी)
हेलिकॉप्टरने टेहळणी
दुसरीकडे आज दुपारी एक हेलिकॉप्टर आणि छोटे विमान आलटून-पालटून वारंवार कारागृहाच्या वरच्या भागात टेहळणी करून कारागृहाच्या आतमधील तसेच बाहेरच्या भागातील स्थितीची पाहणी करीत होते. तिकडे आतमध्ये कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सोमवारी पुन्हा आतमधील फाशी यार्डसह अनेक बराकींची स्वत: पाहणी केली. ‘तेथील’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. कोणत्याच प्रकारचा धोका पत्करायचा नाही, असे बैठकीत असलेल्यांना सांगण्यात आले. सुरक्षेसंदर्भात कुणी लहानशी चूक करीत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आतमधील सर्व अधिकाऱ्यांना बजावून सांगितल्याचे समजते.