वायरमनच्या मृत्यू प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:46+5:302021-05-25T04:09:46+5:30
नागपूर : वायरमनच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून सोनेगाव पोलिसांनी वीज मंडळाच्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रशांत कवडू भलावी (वय ...

वायरमनच्या मृत्यू प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल
नागपूर : वायरमनच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून सोनेगाव पोलिसांनी वीज मंडळाच्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रशांत कवडू भलावी (वय ४२, रा. परसोडी) हे १८ मेच्या दुपारी मिहानमधील दिल्ली पब्लिक स्कूल लगतच्या इलेक्ट्रिक पोलवर काम करत होते. त्यांना जोरदार करंट लागला. त्यामुळे खाली पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. चौकशीअंती असे स्पष्ट झाले की, वीज मंडळाचे कंत्राटदार आरोपी स्वप्नील सावरकर तसेच संबंधित व्यक्तींनी प्रशांत यांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास सांगितले. मात्र, त्यांना सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे प्रशांत यांना करंट लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. चौकशीत हा निष्कर्ष काढल्यानंतर पोलिसांनी अश्विनी प्रशांत भलावी यांची तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपी स्वप्नील सावरकर तसेच त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध कलम ३०४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.
---
दोघांनी लावला गळफास
नागपूर: सोनेगाव आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोनेगाव वस्तीत राहणारे अशोक पन्नालाल बिरजवार (वय ५२) यांनी तलावाच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ७ वाजता हा प्रकार उघड झाला. हरीश अशोक बिरजवार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अशाच प्रकारे तकिया धंतोली येथील रहिवासी अमित धनराज यादव (वय २४) यांनी कळमन्यातील नातेवाइकाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अमित आणि त्याची आई गीता हे दोघे गीता यांच्या कळमन्यात राहणाऱ्या बहिणीच्या घरी पाहून पाण्यासाठी गेले होते. तेथे सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास अमितने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
जखमी कारचालकाचा मृत्यू
नागपूर : जुना बगडगंजमधील रहिवासी प्रकाश संजयराव ढवळे हे शनिवारी झालेल्या अपघातात जखमी झाले होते. त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सोमवारी सकाळी मृत घोषित केले.
प्रकाश ढवळे यांना जखमी करणारा वॅगनआरचा (एमएच ०९/ यू ६३२६) आरोपी चालक पळून गेला. गणेशपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.