कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST2021-08-22T04:09:49+5:302021-08-22T04:09:49+5:30

नागपूर : गोवरमुळे भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात, तर रुबेला हा आजार पूर्णपणे संसर्गजन्य असल्याने ...

Fever, acne can be measles at any age | कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

नागपूर : गोवरमुळे भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात, तर रुबेला हा आजार पूर्णपणे संसर्गजन्य असल्याने गर्भवतींना गर्भपाताचा धोका, बालकांना मोतिबिंदू, हृदयविकार, गतिमंद, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. सर्दी, खोकला, ताप व नंतर अंगावर पुरळ उठणे ही याची मुख्य लक्षणे आहेत. या आजारावर लसीकरण हाच पर्याय आहे.

काय आहे गोवर

लसीकरणामुळे गोवरची साथ कमी झाली आहे. गोवर हा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. यावर कुठलेही अँटीबायोटिक नाही. गोवरवर उपचार नसल्याने कानात ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’सोबतच ‘ब्रोंकायटिस’ आणि घातक ‘न्यूमोनिया’ आणि ‘ब्रेन इन्फेक्शन एन्सेफेलायटिस’पर्यंत त्यात बदल होऊ शकतो. गोवरवर एकमेव लसीकरण हाच पर्याय आहे.

रुबेलाची ‘जर्मन मीजल्स’ म्हणूनही ओळख

रुबेलाला ‘जर्मन मीजल्स’ किंवा ‘थ्री डे मीजल्स’च्या नावानेही ओळखले जाते. हेही एक संक्रामक व्हायरल इन्फेक्शन आहे. शरीरावर आलेले लाल चट्टे हे रुबेलाचे लक्षण आहे. रुबेलाचा विषाणू हा गोवरपेक्षा कमी संक्रमक आणि घातक असतो. कमी ताप, नाक भरणे, डोकेदुखी, लाल डोळे आणि तरुण महिलांच्या सांध्यात वेदना आदी लक्षणे आहेत.

गोवर होण्याचे कारण

गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. हिवाळ्यात हा आजार बळावतो. गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणू प्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकेच्या आतल्या भागात होतो. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात.

-गोवरचे रोगनिदान

:: शरीरात एकदा विषाणूचा प्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला आदी त्रास जाणवतो.

:: गोवर झाल्यावर शरीरावर मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवरची हमखास आढळणारी खूण आहे; पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.

-गर्भवती महिलांमध्ये रुबेला धोकादायक

महिलांच्या गर्भधारणेच्या पूर्वी १२ आठवड्यांत रुबेला झाल्यास ८० टक्के शिशूंना जन्मजात रुबेला सिंड्रोम होण्याची शक्यता असते. नवजात शिशूंसाठी हे धोकादायक ठरते. मुलांचा विकास खुंटण्याची शक्यता असते. शिवाय, मोतिबिंदू, बहिरेपणा, जन्मजात हृदयाचे विकार अन्य अवयवांचा विकार आणि बौद्धिक क्षमता प्रभावित होऊ शकते. पहिल्या तीन महिन्यांत अर्भकासाठी खूप जास्त जोखीम असते. गोवर-रुबेलाच्या संयुक्त लसीकरणामुळे भविष्य सुरक्षित होते.

-पाच लाख मुलांना डोस

गोवर-रुबेलापासून भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी नागपूर शहरात पाच लाखांवर विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. आजही हे लसीकरण शासकीय व खासगी केंद्रांवर सुरू आहे.

Web Title: Fever, acne can be measles at any age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.