नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्र, दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेने मुंबई नागपूर-मुंबई दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सणोत्सवाचे दिवस सुरू आहेत. गणेशोत्सवा पाठोपाठ आता नवरात्रीचा सण अर्थात दसराही पुढ्यात आहे. त्यामुळे गावोगावची मंडळी आपल्या गावी जाऊन कुटुंबियांसह सणाचा आनंद घेण्याचे नियोजन करतात. परिणामी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वेत पाय ठेवायला जागा उरत नाही. अनेक जण गर्दीत प्रवास करतात. त्यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मुंबई नागपूर मार्गावर बाराही महिने मोठी गर्दी असते. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यावेळी आधीपासूनच अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – नागपूर– लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट अतिरिक्त विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई अशा दोन्ही गाड्या प्रत्येकी दहा-दहा फेऱ्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांचे प्रवास भाडेदेखिल अन्य गाड्यांच्या तुलनेत एक तृतियांश जास्त राहणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक
गाडी क्रमांक ०२१३९ एलटीटी–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट ही स्पेशल ट्रेन २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर गुरूवारी मुंबई एलटीटीवरून मध्यरात्री ००.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल.त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०२१४० नागपूर एलटीटी साप्ताहिक सुपरफास्ट ही स्पेशल ट्रेन दर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता मुंबई एलटीटीला पोहचेल. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही गाडी धावणार आहे.
दोन्ही गाड्यांना राहणार २० कोच
या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी २० कोच राहणार आहेत. त्यात १० जनरल सेकंड क्लास, ५ स्लीपर, ३ एसी थर्ड क्लास आणि २ गार्ड-कम-लगेज व्हॅनचा समावेश असणार आहे. प्रवाशांनी सणासुदीची गर्दी लक्षात घेता आधिच आरक्षण करून गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
एलटीटी– गोमतीनगर साप्ताहिक विशेष
मुंबई-नागपूर-मुंबई प्रमाणेच मध्य रेल्वेकडून मुंबई एलटीटी-गोमतीनगर-एलटीटी या स्पेशल ट्रेनही २८ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी सहा फेऱ्या चालविल्या जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.