पिकांना सुपिकता दर्शक निर्देशांकानुसार खते द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:19+5:302021-06-02T04:08:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर हा त्यांच्या गावातील सुपिकता दर्शक निर्देशांकानुसार करावा. ...

पिकांना सुपिकता दर्शक निर्देशांकानुसार खते द्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर हा त्यांच्या गावातील सुपिकता दर्शक निर्देशांकानुसार करावा. यात उत्पादनखर्च कमी हाेण्यास मदत हाेते. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी. तसेच बीजप्रक्रिया करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे यांनी दिली असून, यासाठी हिंगणा तालुक्यात पीक उत्पादकता वाढ माेहिमेंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाने प्रत्येक गावातील मातीचा सुपिकता निर्देशांक जाहीर केला असून, त्याअनुषंगाने पीकनिहाय संयुक्त रासायनिक खतांच्या मात्रा ठरवून दिल्या आहेत. यात रासायनिक खतांची १० टक्के बचत हाेत असल्याने पिकांचा उत्पादनखर्चही कमी हाेताे. शेतकऱ्यांनी हिरवळीचे खत, जैविक खत व कंपोस्ट खताचा वापर वाढवावा, असे आवाहन महेश परांजपे यांनी केले असून, पिकांना फवारणीद्वारे खते दिल्यास प्रत्येकी दाेन टक्के डीएपी व युरियाची बचत हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.
काेराेना संक्रमण काळात दुकानासमाेर गर्दी हाेऊ नये म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर खतांचा पुरवठा केला जात आहे. या याेजनेंतर्गत देवळी (आमगाव) येथील आदर्श अल्पभूधारक शेतकरी गटाची मदत घेण्यात आली असून, या गटाच्या माध्यमातून सात टन खतांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती महेश परांजपे यांनी दिली. राज्य शासनाच्या महाडीबीटी पाेर्टलवर बियाण्यांसह इतर कृषी निविष्ठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या ‘एक गाव, एक वाण’ या उपक्रमाबाबत माहिती दिली जात आहे. ही माेहीम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, डिलर्स असाेसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सालाेडकर, कृषी पर्यवेक्षक विराग देशमुख, कृषी सहायक विद्या वाघ, मंडळ कृषी अधिकारी आर. पी. धनविजय यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी प्रयत्नात आहेत.
...
बियाण्यांची उगवणशक्ती व बिज प्रक्रिया
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील गावागावात शेतकऱ्यांना साेयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, पेरणीपूर्वी बिज प्रक्रिया कशी करायची याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली जात आहे. साेयाबीन पिकावरील खाेडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थामाेमिथॅक्झान तसेच कार्बाेक्झीन, थयरम, थायमिमॅक्झान या औषधांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही जबाबदारी कृषी सहायक निरंजन गहुकर, प्रवीण देवकर, कृषी पर्यवेक्षक विराग देशमुख व कर्मचारी पार पाडत आहेत.