प्रसन्न स्वरांनी रंगलेला ‘एहसास -ए- गझल’
By Admin | Updated: June 2, 2014 02:17 IST2014-06-02T02:17:34+5:302014-06-02T02:17:34+5:30
गझल म्हणजे संवेदनशील माणसांच्या हृदयाला हात घालणारा गीतप्रकार.

प्रसन्न स्वरांनी रंगलेला ‘एहसास -ए- गझल’
नागपूर : गझल म्हणजे संवेदनशील माणसांच्या हृदयाला हात घालणारा गीतप्रकार. आशयघन शब्द आणि रागदारीवर आधारित संगीतांचे कोंदण लेवून आलेल्या गझल रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. जगजित सिंग, गुलाम अली, आदी अनेक गायकांच्या आवाजाने अजरामर झालेल्या गझलचा ‘एहसास -ए- गझल’ कार्यक्रम आज चिटणवीस सेंटरच्यावतीने बनयान सभागृहात आयोजित आला. गालिब ते बशीर बद्र, वसीम बरेलवी, साहिर कबीर, अहमद फराज अहमद यांच्यापर्यंंतच्या अनेक भावपूर्ण गझल सादरीकरणाने या कार्यक्रमात रंगत आणली. प्रसन्न जोशी यांच्या भारदस्त आवाजाने आणि गझलचा अर्थ, आशय समजून केलेल्या सादरीकरणाने तसेच निवेदक श्वेता शेलगावकर यांच्या उर्दूमिश्रीत रसिल्या, अभ्यासपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची उंची वाढली. विरह, व्याकुळता, शृंगार आणि प्रेम या सार्याच भावनांच्या गझलने यावेळी रसिकांचा ताबा घेतला. सर्वच वादकांनी दिलेली मेलोडियस साथ कार्यक्रमात रंग भरणारी होती. गाजलेल्या रचनांनी प्रसन्नने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि नव्या-जुन्या गझलने रसिकांना जिंकले. ‘ साहिर कबीर हे शायर नागपुरातले. त्यांच्या काही गझला सुप्रसिद्ध गझलगायक जगजीत सिंग यांनी गायिल्या आहेत. तर त्यांचा पुत्र समीर कबीर हे देखील गझलकार आहेत. या दोघांच्याही गझल यावेळी प्रसन्नने तयारीने सादर केल्या. या कार्यक्रमाला समीर कबीर प्रामुख्याने उपस्थित होते. ‘ना मै हिंदु हू ना मुसलमाँ, मुझे जीने दो.., तेरी खुशबु गुलाब जैसी..’ आदी गझल सादरीकरणाने ही रंगत वाढली. या कार्यक्रमाचे संयोजन विजय दमानिया यांनी केले होते. त्यांच्या हस्ते याप्रसंगी प्रमुख अतिथी मौलाना अमीरुद्दीन मलिक, विष्णू मनोहर, उस्ताद अकील अहमद यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात तबल्यावर डॉ. देवेन्द्र यादव, संवादिनी श्रीकांत पिसे, व्हायोलिन निशिकांत देशमुख आणि किबोर्डवर राहुल मानेकर यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)