फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने खंडणीत आईचेच दागिने दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 21:42 IST2022-10-17T21:40:54+5:302022-10-17T21:42:33+5:30
Nagpur News सोशल मीडियावर एका २७ वर्षीय आरोपीशी मैत्री करणे अल्पवयीन विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले.

फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने खंडणीत आईचेच दागिने दिले
नागपूर : सोशल मीडियावर एका २७ वर्षीय आरोपीशी मैत्री करणे अल्पवयीन विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले. मैत्रीचे फोटो व्हायरल करण्याच्या त्याच्या धमकीने घाबरलेल्या मुलीने चक्क स्वत:च्या आईचेच दागिने घरातून आणत आरोपीला खंडणी म्हणून दिले. या प्रकरणात सत्य समोर आल्यानंतर आरोपीविरोधात विनयभंगासह धमकी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कुणाल गणेश यादव (२७, मानेवाडा रोड, दुर्गा माता मंदिराजवळ) असे आरोपीचे नाव आहे. कुणालची संबंधित विद्यार्थिनीशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली व ते काही वेळा भेटले. कुणाल तिला भेटण्यासाठी जबरदस्ती आग्रह करायचा. त्याने विविध अडचणींची कारणे देत तिच्याकडून पैसे उकळले होते. १९ ऑगस्ट रोजी त्याने तिला फोन करून लष्करीबाग येथे दहा नंबर पुलाजवळ भेटायला बोलवले व यूपीएससीच्या तयारीसाठी १ लाख रुपयांची गरज असल्याचे कारण देत त्याने तिला पैसे आणून दे, असे म्हटले. तिने नकार दिला असता, त्याने तिचा विनयभंग केला व तिच्यासोबत काढलेले फोटो सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करत तिच्या पालकांना पाठविण्याची धमकी दिली.
त्याने खंडणीच मागितल्याने मुलीचा नाईलाज झाला व तिने घरातून तिच्या आईचे सोन्याचे ८४ हजारांचे दागिने त्याला आणून दिले. घरी कळाले तर आणखी अडचणी वाढतील या विचारातून विद्यार्थिनीने त्याला दागिने परत मागितले असता, कुणालने तिला अश्लील शिवीगाळ करत बदनामीची धमकी दिली. घरात दागिने दिसत नसल्याने विद्यार्थिनीला तिच्या आईने विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुणालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.