एफडीएसमोर ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: July 29, 2014 00:50 IST2014-07-29T00:50:12+5:302014-07-29T00:50:12+5:30
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कामठी येथील चार औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केल्याच्या विरोधात सोमवारी कामठी व कन्हान येथील १००वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

एफडीएसमोर ठिय्या आंदोलन
औषध विक्रेत्यांचा कारवाईला विरोध
नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कामठी येथील चार औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केल्याच्या विरोधात सोमवारी कामठी व कन्हान येथील १००वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात एफडीएचे सहआयुक्त अशोक गिरी यांना निवेदन देऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली.
राज्यातच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात एफडीएच्या औषध दुकानांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. यात त्रुटी आढळणाऱ्या दुकानांचे परवाने तत्काळ रद्द केले जात आहेत. एफडीएने आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३५९ परवाने रद्द केले आहेत. मागील १० दिवसांपासून एफडीएची चमू कामठी येथील औषध दुकानांची तपासणी करीत आहे.
चमूला चंदा मेडिकल स्टोअर्स, हफीज मेडिकल स्टोअर्स, अहमद मेडिकल स्टोअर्स यासह आणखी एका दुकानामध्ये त्रुटी आढळून आल्या. या चारही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.
याविरोधात आ. बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनची (एनडीसीडीए) अध्यक्ष रवी गोयल व सचिव गिरीश भट्टड यांच्या मार्गदर्शनात १०० वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सहआयुक्त गिरी यांना निवेदन देण्यात आले. यात परवाने रद्दची कारवाई न करता निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर गिरी यांनी झालेली कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव खात्याच्या मंत्र्यांकडे पाठविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)
औषध विक्रेत्यांचा बंद
औषध विक्रेत्यांचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ कामठी, कन्हान, कोराडी व महादुला येथील ३०० च्यावर औषध दुकानदारांनी रविवार व सोमवारी बंद पुकारला होता. या बंदचा फटका रुग्णांना बसला. काहींना नागपुरात येऊन औषध घ्यावे लागल्याचे सांगितले.