नागपुरात सोनपापडी कारखान्यावर एफडीएची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:45 IST2019-01-03T23:44:11+5:302019-01-03T23:45:03+5:30
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.

नागपुरात सोनपापडी कारखान्यावर एफडीएची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.
संचालक राजू शिवाजी भुंजे हे सोनपापडी बनविताना पिस्त्याऐवजी हिरवा रंग लावलेले शेंगदाण्याच्या तुकड्यांचा वापर करीत असल्याचे आढळून आले. या सोनपापडीची बाजारात विक्री करण्यात येत होती. हिरव्या रंगाचे शेंगदाण्याचे तुकडे व कृत्रिम हिरवा खाद्यरंग यांचे विश्लेषणास्तव नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी सोनपापडीच्या लेबलवर घटक पदार्थांमध्ये पिस्ता असल्याचा उल्लेख आढळून आला. प्रत्यक्षात हिरव्या रंगाचे शेंगदाण्याचे तुकडे टाकून ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याने कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, अभय देशपांडे आणि प्रफुल्ल टोपले यांनी केली.
गैरमार्गाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करून व्यवसाय करणाºया उत्पादकांविरुद्ध अशाप्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अन्न व्यवसाय चालकांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत तरतुदी तसेच परिशिष्ट-४ मध्ये नमूद केलेल्या अन्नसुरक्षा प्रणालीचा काटेकोरपणे अवलंब करून व्यवसाय करण्याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अथवा गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार विभागाकडे करावी, असे शशिकांत केकरे सांगितले.