९५ लाखांच्या लोभात ४५ हजार गमावले
By Admin | Updated: July 13, 2014 00:58 IST2014-07-13T00:58:32+5:302014-07-13T00:58:32+5:30
टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे देऊ, असे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणीचे ४५ हजार रुपये हडपले.

९५ लाखांच्या लोभात ४५ हजार गमावले
नागपूर : टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे देऊ, असे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणीचे ४५ हजार रुपये हडपले.
प्रियदर्शनी ज्ञानेश्वर ठाकरे (वय २९, रा. सिव्हिल लाईन, नागपूर) यांनी मे २०१४ मध्ये एशिया टॉवर कंपनी लिमिटेडची एक जाहिरात वाचली. टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे मिळेल, असे या जाहिरातीत नमूद होते. त्यामुळे प्रियदर्शनी यांनी जाहिरातीतील नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी आरोपी राहुल कुमार याने जाहिरात खरी असून, तुम्हाला टॉवर लावण्यापूर्वी कंपनीकडे नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) म्हणून एका टॉवरसाठी १५ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार, प्रियदर्शनी यांनी तीन टॉवरसाठी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे ४५ हजार रुपये जमा केले. ४ जूनपर्यंत हा व्यवहार झाला. मात्र, टॉवर काही लागले नाही आणि त्याचा अॅडव्हॉन्सही मिळाला नाही. स्वत:चे नाव राहुल आणि अजय कुमार सांगणारे आरोपी प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण सांगून टाळत असल्यामुळे प्रियदर्शनीला संशय आला. नंतर आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी राहुल कुमार, अजय कुमार आणि एशिया टॉवर कंपनीविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)