बाप अबोल होता, पुत्र झाला सांगाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:27+5:302021-05-23T04:08:27+5:30
- लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची अखेरची जाहीर हजेरी : चेहऱ्यावरील निरागसता, व्यक्त होण्याची हुरहुर अनुभवली होती नागपूरकरांनी प्रवीण ...

बाप अबोल होता, पुत्र झाला सांगाती
- लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची अखेरची जाहीर हजेरी : चेहऱ्यावरील निरागसता, व्यक्त होण्याची हुरहुर अनुभवली होती नागपूरकरांनी
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २२ जानेवारी २०१९ हा दिवस राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची अखेरची जाहीर हजेरी असलेला दिवस. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात त्यांचा नागपूरकरांच्या वतीने जाहीर सत्कार झाला होता. मात्र, ते अबोल होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि ते धड बोलूही शकत नव्हते. अशा वेळी श्रावणबाळाच्या रूपात त्यांचा पुत्र अमर सांगाती होऊन नागपूरकरांपुढे उभा होता. लक्ष्मण यांनी केलेला प्रत्येक इशारा, भावना अमर अलगद व्यक्त करत होता. आपल्या सांगीतिक कारकीर्दीत जगभरातील रसिकांना गुणगुणण्यास भाग पाडणारे लक्ष्मण अबोल पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. मात्र, त्यांच्याच हजेरीत नागपूरकर गायकांकडून सादर झालेली त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी ऐकूण ते गहीवरले होते आणि सोबत रसिकही.
हार्मोनी इव्हेंट्स, लोकसेवा प्रतिष्ठान व बेयॉण्ड किचनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन झाले होते. यावेळी श्वेता शेलगावकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली आणि ‘ये मौसम का जादू है मितवा’ हा गाण्यांचा कार्यक्रमही पार पडला. लक्ष्मण यांच्या उपस्थितीत मुलाखतीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमर यांनी दिली आणि सोबतच नागपुरातील जुन्या दिवसांची उजळणीही केली. उंटखाना येथे झालेला जन्म, घरातील शास्त्रीय संगीताचे वातावरण, तेथून ऑर्केस्ट्रामधील गाणी आणि दादा कोंडके यांनी केलेली निवड, बंधू सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत जमवलेली जोडी ते जोडीचे राम-लक्ष्मण असे दादा कोंडके यांनीच केलेले नामकरण, नागपुरात विविध गीतांवर चढविलेले सांगीतिक अलंकार या सर्वांचा उलगडा यावेळी झाला होता.
------------------
सेमिनरी हिल्सच्या नयनरम्य वातावरणात सुचली ‘सिग्नेचर ट्युन’
‘हम आपके है कौन’ हा चित्रपट भारतीय चित्रपटांतील सर्वात मोठा हिट म्हणून गणला जातो. या चित्रपटातील राम-लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कधीही विस्मरणात न जाणारी अशीच आहेत. याच चित्रपटात जेव्हा प्रेम (सलमान खान) माधुरी दीक्षित यांना घेण्यास जातो, तेव्हाच्या प्रवासातील गाणे ‘ये मौसम का जादू है मितवा’ या गीतावर चढलेला संगीतसाज सेमिनरी हिल्स येथून स्मरल्याचे या मुलाखतीत लक्ष्मण यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटात पूर्णवेळ जी सिग्नेचर ट्युन वाजते, त्याचा जन्मही सेमिनरी हिल्समध्ये फिरायला गेले असता त्यांना सुचल्याचे ते म्हणाले होते.
----------------
‘फर्श से अर्श तक’चा प्रवास
लक्ष्मण प्रारंभीच्या स्ट्रगलर वेळेत नागपुरातून मुंबईत गेले. तेव्हा तेथे ना कुणाची ओळखी ना काही. अशा वेळी मुंबईत त्यांनी स्मशानभूमीतही रात्र काढल्याचे यावेळी त्यांनी सांगितले होते. त्यानंतर दादा कोंडके ते राजश्री बॅनर आणि नंतर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी गाजवलेले अधिराज्य अनेकांना प्रेरक असेच राहिले.
-----------
राम-लक्ष्मण जोडीचे नामकरण
विजय पाटील व त्यांचे बंधू सुरेंद्र हेंद्रे हे गाण्याचा कार्यक्रम करत असताना दादा कोंडके समोर बसले होते. दादांना त्यांची गाणी आवडली आणि त्यांनी दोघांनाही ‘पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध करण्याची ऑफर दिली. त्यावेळी संगीतकारांच्या जोड्या काम करीत असत. त्यामुळे, दादा कोंडके यांनीच सुरेंद्र हेंद्रे यांचे ‘राम’ व विजय पाटील यांचे ‘लक्ष्मण’ असे नामकरण केले आणि ‘राम-लक्ष्मण’ या जोडीचा जन्म झाला. राम उपाख्य सुरेंद्र हेंद्रे यांचे १९७६मध्ये निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी ‘राम-लक्ष्मण’ या नावानेच आपली संपूर्ण कारकीर्द घडवली. विजय पाटील यांचा संगीतकार असलेला मुलगा अमर हे सुद्धा आपल्या नावापुढे अमर राम लक्ष्मण हेच नाव लावतात, हे विशेष.
---------------
पृथ्वीराजच्या गायनाने झाले होते भावुक
या जाहीर कार्यक्रमात ७० टक्के गतिमंद असलेल्या पृथ्वीराज इंगळे यांनी ‘ये तो सच है के भगवान है’ हे राम-लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सादर केले होते. एक गतिमंद मुलगाही आपले गाणे सादर करू शकतो, हे बघून विजय पाटील भावुक झाले होते. अमर यांनीही या गीताचे सार्थक झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली होती.
.............