नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने सख्ख्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला पॉक्सो कायद्यातील कलम ६ अंतर्गत आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. ए. एम. राजकारणे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना यशोधरानगर पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
आरोपीला या शिक्षेशिवाय पॉक्सो कायद्यातील कलम १० अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर कलम १२ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीला कारावासाची शिक्षा एकत्र भोगायची आहे. त्याला १७ एप्रिल २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. ही घटना ६ एप्रिल २०१८ रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलगी १७ वर्षांची होती. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले.
मुलीला तीन लाख रुपये भरपाई
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पीडित मुलीला तीन लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी ७५ हजार रुपये मुलीला अदा करण्यात आले आहेत तर, उर्वरित रक्कमेची मुलीच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत दहा वर्षांची मुदत ठेव करण्यात आली आहे.