वर्षाआधी वडील गेले, आईने जाता जाता अवयवदान केले
By सुमेध वाघमार | Updated: April 12, 2024 18:20 IST2024-04-12T18:19:38+5:302024-04-12T18:20:09+5:30
नागपूर : वर्षाभरापूर्वी वडिल गेले. शेतमजुरी करून आई कसेतरी घर चालवित होती. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हते. ...

वर्षाआधी वडील गेले, आईने जाता जाता अवयवदान केले
नागपूर : वर्षाभरापूर्वी वडिल गेले. शेतमजुरी करून आई कसेतरी घर चालवित होती. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हते. कळम यवतमाळ येथून घरी परत येत असताना रस्त्याच्या ब्रेकरवरून गाडीचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा ‘ब्रेन डेड’ झाला. त्या दु:खातही त्यांच्या आई-वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दोघांना नवे आयुष्य मिळाले. परंतु, तीन आणि पाच वर्षाची मुले पोरकी झाली.
मनीषा कोकांडे (३०) त्या आईचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील कळम तहसील मुसळ या गावातील त्या रहिवासी होत्या. प्राप्त माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. घरासोबतच तीन आणि पाच वर्षांच्या मुलांची जबाबदारी आई मनीषावर आली. शेतमजुरी करून त्या घर चालवित होत्या. मुलांना शिकवून मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. तीन दिवसांपूर्वी कळम यवतमाळ येथून घरी परत येत असताना रस्त्यावरील उंच स्पीड ब्रेकर जीवघेणा ठरला. गाडी उसळल्याने त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर जखम झाली.
यवतमाळ रुग्णालयातून त्यांना थेट वर्धा सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही त्यांची प्रकृती खालवत गेली. डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. इशान गडेकर, डॉ. संदीप इरटवार, डॉ. अमोल आंधळे व डॉ. प्रीन्स वर्मा या डॉक्टरांच्या चमूने मनीषा यांची तपासणी करून त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. जावयाच्या मृत्यूच्या दु:खातून सावरत नाही तोच मुलगी मनीषाचा मृत्यूने तिचे वडील रमेश पेंदोर व आई मंदा पेंदोर यांना मोठा आघात बसला. डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करण्याविषयी समुपदेशन केले. त्यांनी अवयवदानाला संमती दिली. याची माहिती, विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दीनेश मंडपे यांनी अवयवदानाची प्रक्रीया पार पडली.
दोन महिलांना जीवनदान
मनीषा यांची एक किडनी आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटलमधीलच ४९वर्षीय महिलेला तर दुसरी किडनी याच हॉस्पिटलमधील २३ वर्षीय महिलेला दान करून जीवनदान दिले. मनीषा यांना ‘हेपेटायटिस’चा आजार असल्याने यकृताचे दान होऊ शकले नाही, अशी माहिती ‘झेडटीसीसी’ यांनी दिली. या वर्षातील हे १४वे अवयवदान असून आतापर्यंत १४४ दात्यांकडून अवयवदान झाले.