अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: December 8, 2014 01:00 IST2014-12-08T01:00:31+5:302014-12-08T01:00:31+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याची आत्महत्या
शेतात विष प्राशन केले : नापिकी व कर्जबाजारीपणा
नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या आत्महत्येमुळे शेतकऱ्यांपुढे असलेल्या संकटांचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.
कळमेश्वर तालुक्यातील धुरखेडा येथील रहिवासी केशव चौधरी (वय ३८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चौधरी यांची उपजीविका शेतीवर अवलंबून होती. गेल्या काही वर्षांपासून नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्यावर बँकेचे कर्ज आहे. यावेळी चांगले पीक झाले तर कर्ज फेडून टाकू, अशा विचारात असतानाच पीक हातून गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. रविवारी सकाळी ते शेतात गेले व तेथेच कीटकनाशक पिऊन त्यांनी आत्महत्या केली. धापेवाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येची माहिती मिळताच आ. सुनील केदार, पं.स. सदस्य वैभव घोंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबा कोढे यांनी चौधरी कुटुंबीयांना भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. दोन वर्षांपूर्वी मृतक केशव यांचा भाऊ तर वर्षभरापूर्वी पुतण्याचे अपघाती निधन झाले होते. चौधरी यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)