शेतकरी, पुरोहित अन् व्यावसायिक नवरा नको गं बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:29+5:302021-03-17T04:07:29+5:30

- इंजिनिअर्सना प्रचंड मागणी : आपल्याच क्षेत्रातील वर-वधूंना पसंती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय संस्कृतीत विवाह हा व्यवहार ...

Farmers, Priests and Professional Husbands | शेतकरी, पुरोहित अन् व्यावसायिक नवरा नको गं बाई!

शेतकरी, पुरोहित अन् व्यावसायिक नवरा नको गं बाई!

- इंजिनिअर्सना प्रचंड मागणी : आपल्याच क्षेत्रातील वर-वधूंना पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संस्कृतीत विवाह हा व्यवहार नव्हे तर दोन जीवांचा, मनांचा आणि सोबतच दोन कुटुंबांचा मेळ होय. म्हणूनच साताजन्माची संकल्पना या संस्काराला जोडली गेली आहे. त्यामुळेच, विवाह संस्कार हा प्रत्येक पुरुष व स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि एका अर्थाने नव्या आयुष्यास प्रारंभ होतो, असे म्हटले जाते. पूर्वी मुलाच्या कर्तृत्वावर व मुलीच्या संस्कारावर तसेच दोन्ही कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेवर विवाह जोडले जात असत. वर्तमानात स्थिती बदलली आहे. आता मुलाचे कर्तृत्व आणि मुलीचे संस्कार, बँक बॅलेन्स व भविष्यवेधी नियोजनावर अर्थात मुलाच्या प्रोफेशनवर विवाह संस्कार पार पडत असल्याचे दिसून येते. त्याच कारणाने वधू किंवा वधू कुटुंबीयांकडून शेतकरी, पौरोहित्य करणारे गुरुजी किंवा व्यावसायिक वर नाकारत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक वर विवाहाविना आहेत तर वधूही अपेक्षित वर मिळत नसल्याने एकटे आयुष्य जगत आहेत.

इंजिनिअर्सचा भाव जादा

बारावीनंतर मुलगा पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर्सच्या शिक्षणात गेला की लागलीच प्लेसमेंट मिळते आणि पगार सुरू होतो. पुढे त्याच्या कुवतीनुसार कंपन्या बदलत जातात आणि प्रमोशनही होत जाते. एका अर्थाने सुखासीन आयुष्याची निश्चिती असल्याने इंजिनिअर्स मुलांची व मुलींची मागणी प्रचंड आहे. वर-वधू दोघेही इंजिनिअर्स जोडीदाराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

सेम प्रोफेशन अनुकूल

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. व्यवसाय सेट असल्याने आणि त्याच व्यवसायात साथ देणारा, देणारी जाेडीदार मिळाली तर कसल्याच त्रुटी उत्पन्न होत नाहीत. कलावंत कलेची जाण किंवा आदर असणारा जोडीदार निवडण्यावर भर देतो. अशी स्थिती वेगवेगळ्या क्षेत्रातील वर- वधूंची आहे. सेम प्रोफेशन असले की एकमेकांच्या अडचणी समजवून सांगण्यास अडचण निर्माण होत नाही आणि आयुष्य सुखासीन असते, अशी या मागची धारणा आहे.

मुुंबई-पुणे किंवा होम टाऊनला प्राधान्य

विशेषत: मुली नवरा मुलगा मुंबई-पुणे येथील असल्याला प्राधान्य देतात. बऱ्याच मुली शिकून याच शहरांमध्ये नोकरीला असतात. तेव्हा लग्न झाल्यावर नोकरी सोडावी लागू नये, असा त्यामागचा हेतू असतो. विशेषत: आयटी क्षेत्रात हा कल दिसून येतो. देशातील कोणत्याही शहरात नोकरी असली तर त्याच शहरातील किंवा मुंबई-पुणे येथील मुलगा मिळाला तर तिथे नोकरी मिळणे सहज शक्य असते, हेही त्यामागचे कारण आहे. अनेक मुलींना होम टाऊन नवरा अधिक प्रिय असल्याचे दिसून येते.

शेतकरी, पुरोहित, व्यावसायिक धोक्याचे

आजकाल शेती बेभरवशाची असल्याने शिकलेला असो वा सधन तरी मुली किंवा मुलीचे कुटुंबीय शेतकरी नवरा नको, अशीच भूमिका घेताना दिसतात. पौरोहित्य करणाऱ्यांची स्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे. वेदांचा अभ्यास, ज्ञानी आणि तत्त्वचिंतक असला तरी धोतरावर राहणारा नवरा असला की अनेक नव्या आधुनिक युगात वावरणे कठीण जाते म्हणूनच पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना नापसंती दिली जात आहे. व्यवसायाची स्थिती एकसारखी नसते. चढ-उतार सातत्याने असते. अशा स्थितीत नसली भानगड नको म्हणून व्यावसायिक नवरा नको गं बाई, अशी धारणा मुलींची झाली आहे.

----------

एकमेकांचा सन्मान महत्त्वाचा

एकमेकांचे प्रोफेशन पाहून वर-वधूंची निवड करणे गैर नाही. यामुळे एकमेकांचा सन्मान राखला जातो. काळाच्या ओघात प्रत्येकाला आपल्या पसंती आजमावणे योग्य आहे. मात्र, मुलींच्या बाबतीत दिसून येणारा सासू-सासऱ्यांना नकार, हा चिंतेचा विषय आहे. या प्रकारामुळे अशा मुलींबाबत समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. एकमेकांच्या माता-पित्याचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. सोबतच मुलाच्या व मुलीच्या कर्तृत्वावर विश्वास असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

- सुप्रिया केकतपुरे, शाखा प्रमुख : अनुरूप विवाह संस्था, धरमपेठ

-------

जगाचे पोट भरणाऱ्यालाच नकार

शेतकरी नसेल तर जगाचे पोट कोण भरणार, हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. शेतकऱ्यांविषयी सुशिक्षित लोक कळवळा व्यक्त करतात. मात्र, विवाहाचा विषय येतो, तेव्हा हेच लोक शेतकरी नवरा नको, असा उपहास करतात. मात्र, मुलगा ३५ वर्षाचा आहे, शिकलेला आहे आणि सोबत कलावंतही आहे. पोट भरतो आणि शेतीच्या भरवशावरच सगळ्या हौस भागवतो आहे. मात्र, त्याला स्थळ येतच नाही, ही दैना आहे.

- शीला रमेश उमप, शेतकरी

....................

Web Title: Farmers, Priests and Professional Husbands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.