शेतकऱ्यांची होळी खरेदी केंद्रावरच

By Admin | Updated: March 12, 2017 02:47 IST2017-03-12T02:47:05+5:302017-03-12T02:47:05+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय खाद्य महामंडळ (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया - एफसीआय)च्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले

The farmers of the Holi Purchase Center | शेतकऱ्यांची होळी खरेदी केंद्रावरच

शेतकऱ्यांची होळी खरेदी केंद्रावरच

तूर खरेदी संथगतीने : पाच दिवसांत ११६६ क्विंटल खरेदी
सोनम कळंबे   नरखेड
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय खाद्य महामंडळ (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया - एफसीआय)च्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रावर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी केली जात आहे. या केंद्राचा शुभारंभ २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला असला तरी केवळ पाच दिवस तुरीची खरेदी करण्यात आली. या पाच दिवसांत ७४ शेतकऱ्यांकडून केवळ ११६६.५० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदीची संथगती पाहता शेतकऱ्यांना होळी व धुलिवंदन केंद्रावरच साजरे करावे लागणार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, या प्रकारावरून शासनाची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्थाही स्पष्ट होते.
नरखेड येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव एफसीआयने नरखेड बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्र सुरू केले. केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदी न करण्याची मानसिकता विचारात घेता तूर खरेदीसाठी सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस निर्धारित करण्यात आले. एफसीआयच्या अधिकाऱ्यांच्या अडेल धोरणामुळे तूर खरेदीचा तिढा सोडविण्यासाठी सुरुवातीला तहसीलदार जयवंत पाटील व नंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनाही आग्रही भूमिका घेत मध्यस्थी करावी लागली.
या केंद्रावर केवळ पाच दिवस तुरीची खरेदी करण्यात आली. त्यात शुक्रवारी (दि. ३) तीन शेतकऱ्यांकडील ४२.५० क्विंटल, सोमवारी (दि. ६) १० शेतकऱ्यांकडील २३२.६६ क्विंटल, मंगळवारी (दि. ७) १९ शेतकऱ्यांकडील ३०५ क्विंटल, बुधवारी (दि. ८) २२ शेतकऱ्यांकडील ३५०.१८ क्विंटल आणि गुरुवारी (दि. ९) २० शेतकऱ्यांकडील २३६.१६ क्विंटल तुरीचा समावेश आहे. यावर्षी तालुक्यात तुरीच्या उत्पादनात आमूलाग्र वाढ झाली आहे. त्यातच तुरीचे बाजारभाव पडले. कमी किमतीत का होईना व्यापारी तूर खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनी तुरी विकायच्या कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला.
परिणामी, काटोल येथे नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर सुरुवातीला शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी करण्यात आल्याने शेतकरी प्रतिनिधी आक्रमक झाले होते. त्यानंतर नरखेड येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना तीन दिवस आंदोलनही करावे लागले. या केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदी यातील तफावत पाहता शासनाची शेतकऱ्यांप्रतीची अनास्था स्पष्ट झाली आहे.

पोती उघड्यावर
नरखेड खरेदी केंद्रावर रोज किमान अडीच ते तीन हजार क्विंटल तुरीची आवक होत असून, केवळ ३०० क्विंटल तुरीची खरेदी केली जात आहे. परिणामी आजमितीस बाजार समितीच्या आवारात अंदाजे सात हजार क्विंटल तुरी मोजणीविना पडल्या आहेत. यातील काही पोती टिनाच्या शेडखाली ठेवण्यात आली असून, अंदाजे चार हजार क्विंटल तुरीची पोती उघड्यावर ठेवली आहे. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी बरसल्यास किंवा गारपीट झाल्यास उघड्यावरील तुरीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: The farmers of the Holi Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.