वर्हाडातील शेतकर्यांची हिरवी स्वप्नं करपली
By Admin | Updated: August 18, 2014 22:38 IST2014-08-18T22:15:27+5:302014-08-18T22:38:05+5:30
पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांची स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत.

वर्हाडातील शेतकर्यांची हिरवी स्वप्नं करपली
अकोला : पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांची स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. दुबार, तिबार पेरणी करूनही अनेक शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली असून, या संकटाने शेतकरी पार हवालदिल झाले आहेत. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हयात जवळपास ९२ टक्के म्हणजेच ३0 लाख १३ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक १४ लाख ९0 हजार ६00 हेक्टरवर सोयाबीन तर त्याखालोखाल ९ लाख ३७ हजार ४00 हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्यांना विलंब झाला आहे. त्यामुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामध्ये सलग तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिकं कोमेजू लागली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान,यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९४ टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी पेरणी केली आहे. अमरावती ९0 टक्के, वाशिम ९४ टक्के, अकोला ८५ व बुलडाणा जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. सोयाबीनचा पेरा यंदा गतवर्षीपेक्षा कमी असला तरी शेतकर्यांनी पहिली पसंती सोयाबीनलाच दिली असून, या पाच जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. कापसाचा पेराही वाढला असून, या पाच जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र यावर्षी ९ लाख ३७ हजार ४00 हेक्टरपर्यंंत पोहोचले आहे. ३ लाख ४६ हजार ४00 हेक्टरवर तूर पेरणी झाली आहे. यावर्षी मूग पेरणीची वेळ निघून गेली असतानाही या पाच जिल्हय़ात ६४ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडिदाची पेरणी घटली असून, ३२,२00 हेक्टर क्षेत्रावर या पिकाचा पेरा शेतकर्यांनी केला आहे. ज्वारीची पेरणी ७६,८00 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे.
** ३0 लाख हेक्टरवरील पिकांनी मान टाकली
२३ जुलै रोजी एक दिवस पाऊस पडला. २४ जुलैपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. तेव्हापासून सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांची गती मंदावली आहे. या अगोदर पाऊस रिमझिम पडला आणि आता तापमान वाढू लागल्याने पिके कोमेजू लागली आहेत. वाशिम: ३ लाख ९९ हजार ४00 हेक्टर; अमरावती : ६ लाख ४२ हजार ५00 हेक्टर; यवतमाळ: ८ लाख ५१ हजार३00 हेक्टर