शेतकऱ्यांना दोन कोटींचा विमा लाभ!

By Admin | Updated: July 12, 2014 02:25 IST2014-07-12T02:25:43+5:302014-07-12T02:25:43+5:30

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे.

Farmers benefit two crore! | शेतकऱ्यांना दोन कोटींचा विमा लाभ!

शेतकऱ्यांना दोन कोटींचा विमा लाभ!

नागपूर : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. यात गतवर्षी जिल्ह्यातील १३ हजार ६५५ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे एकूण ९७ लाख ३७ हजार ५९५ रूपयांचा विमा हप्ता जमा केला होता. त्या मोबदल्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ७ हजार ३०३ शेतकऱ्यांना २ कोटी ९१ लाख ९१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.
यंदा जिल्ह्यात पुन्हा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी आवाहन केले आहे. ही योजना नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागातील भात, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी आधी येत असलेल्या मुदतीच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला तलाठ्यांचा पेरणी दाखला ग्राह्य मानल्या जात होता. परंतु राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अलीकडेच एक पत्र जारी करून, कृषी सहायकांचाही पेरणी दाखला पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा मिळणार आहे. अनेकदा तलाठी हा गावात भेटत नसल्याने, शेतकऱ्यांना मुदतीत पीक विम्याचा प्रस्ताव सादर करता येत नाही. परंतु आता शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडूनसुद्धा तो दाखला घेता येणार आहे.
याशिवाय नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस पिकासाठी यंदा प्रथमच पथदर्शक स्वरूपात हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी गत ३० जून २०१४ ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना या ‘राष्ट्रीय पीक विमा योजने’चा लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers benefit two crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.