नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या पारंपरिक चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. बैठकीनंतर महाविकास आघाडीतर्फे आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. शेतकरी आत्महत्या, कमी एमएसपी दरात पिकांची खरेदी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था अशा गंभीर समस्यांमुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सुनील प्रभू, महेश सावंत, जे.एम. अकबर उपस्थित होते.यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मात्र सरकार जल्लोषाचे आयोजन करत आहे. विजयी मिरवणुका काढत आहे. राज्यातील बीडमध्ये एका सरपंचाची निघ्रुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येत असल्याचीही माहिती आहे. ईव्हीएमच्या भरवश्यावर आलेले हे सरकार आहे. आमचे संख्याबळ कमी असले तरी हिवाळी अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार असा दावाही त्यांनी केला.