नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:44 IST2022-09-12T20:43:58+5:302022-09-12T20:44:30+5:30
Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना
नागपूर : आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरा येथे साेमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आठवडाभरातील नरखेड तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.
राजीव बाबुराव जुडपे (वय ५८, रा. पिंपळदरा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे तीन एकर शेती असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यांनी यावर्षी काही शेती ठेक्यानेही केली हाेती. शिवाय, शेतीच्या खर्चासाठी भारतीय स्टेट बँकेच्या थडीपवनी (ता. नरखेड) शाखेकडून पीक कर्ज घेतले हाेते.
यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगल्या असलेल्या पिकांचे मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार व नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या मशागतीवर खर्च केलेला पैसा हाती येण्याची शक्यता मावळल्याने तसेच पीक कर्जाचा भरणा करणे व वर्षभराच्या घर खर्चाची व्यवस्था करण्याच्या चिंतेमुळे ते हताश हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिली. त्यातच त्यांनी साेमवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.
गावातील एकजण बकऱ्या चारण्यासाठी राजीव जुडपे यांच्या शेताकडे गेला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार धोंडे करीत आहेत.
आठवडाभरातील तिसरी शेतकरी आत्महत्या
नरखेड तालुक्यातील आठवडाभरातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. याच कारणामुळे यापूर्वी लाेहारीसावंगा येथील बंडू ऊर्फ ईश्वरदास नारायण बन्नगरे (५२) यांनी साेमवारी (दि. ५), तर विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा) यांनी शनिवारी (दि. ३) आत्महत्या केली. मागील महिन्यात तालुक्यातील आणखी दाेन शेतकऱ्यांनी हताश हाेऊन मृत्यूला कवटाळले. या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी सरकार व प्रशासन काहीही करायला तयार नाही.