फॅन्सी नंबर प्लेट, दंड केव्हा वाढेल?
By Admin | Updated: January 21, 2015 00:22 IST2015-01-21T00:22:36+5:302015-01-21T00:22:36+5:30
फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकावर केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत असून यात वृद्धी करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन

फॅन्सी नंबर प्लेट, दंड केव्हा वाढेल?
निर्णयाची प्रतीक्षा : हायकोर्टात शासनाला एक आठवडा वेळ
नागपूर : फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकावर केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत असून यात वृद्धी करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केले होते. यासंदर्भात शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. न्यायालयाने सोमवारी यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाला आणखी एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला.
किरकोळ दंडामुळे वाहनचालकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होत नाही. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू अशी महागडी वाहने चालविणाऱ्यांसाठी १०० रुपये दंड अगदीच किरकोळ आहे, असे मत न्यायालयाने नोंदवून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना सरकारी वकिलाला केली होती. मोटार वाहन कायदा-१९८८ व मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध असतानाही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे. यामुळे सत्पालसिंग रसपालसिंग रेणू यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. केंद्र शासनाने २८ मार्च २००१ रोजी अधिसूचना काढून हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्सचा नियम लागू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०११ रोजी सर्व राज्यांना या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आजही नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग इत्यादीसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.