प्रसिद्ध नकलाकार दादा घाटोड यांचे निधन

By Admin | Updated: December 24, 2014 00:42 IST2014-12-24T00:42:07+5:302014-12-24T00:42:07+5:30

सहजसुंदर अभिनयाने नकलांच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध नकलाकार दादा घाटोड यांचे आज मंगळवारी मध्य प्रदेशातील सौंसर येथे आजारपणामुळे निधन झाले.

Famous gimmick Dada Ghatod passed away | प्रसिद्ध नकलाकार दादा घाटोड यांचे निधन

प्रसिद्ध नकलाकार दादा घाटोड यांचे निधन

नागपूर : सहजसुंदर अभिनयाने नकलांच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध नकलाकार दादा घाटोड यांचे आज मंगळवारी मध्य प्रदेशातील सौंसर येथे आजारपणामुळे निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षांचे होते.
वणी येथे झालेल्या अखिल भारतीय नकलाकार संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. घाटोड यांचा जन्म सौंसर येथे झाला. परंतु त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयात झाले. मराठी रंगभूमीच्या उत्कर्षाचा तो काळ होता. घाटोड यांच्या पिढीतील अनेकांना ही रंगभूमी आकर्षित करीत होती. दादांमध्ये असलेल्या अभिनयाच्या आवडीने तेही या क्षेत्राकडे वळले. जीवनात पदोपदी वेदना झेलणाऱ्या सर्वसामान्यांना दोन घडी का होईना हसता यावे, म्हणून त्यांनी विनोदाचा आधार घेतला. त्यांच्या नकला खूप गाजल्या. आचार्य अत्रे यांची नक्कल तर त्यांनी त्यांच्यासमोरच इतक्या सुंदर पद्धतीने सादर केली, की अत्रेंना हसू आवरता आले नाही. दादांचा आणखी एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. एकदा एका गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कीर्तन सुरू होते. या कीर्तनात दादांनी आचार्य विनोबा भावेंच्या वेशभूषेत प्रवेश केला, तेव्हा राष्ट्रसंतही त्यांना विनोबाच समजून बसले. ज्येष्ठ पत्रकार जगन वंजारी, शरद अकोलकर यांच्या सोबतीने त्यांनी अनेक कार्यक्रम गाजवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्काराने दादांना गौरविण्यात आले होते. त्यांच्यावर उद्या बुधवारी सौंसर येथे अंत्यसंस्कार केले जातील. (प्रतिनिधी)

Web Title: Famous gimmick Dada Ghatod passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.