सीसीटीव्हीमधील भुताच्या प्रतिमेचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:50+5:302021-07-28T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनी येथील चाफले लेआउटमध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली भुताची प्रतिमा असल्याचा दावा करणारा व्हिडिओ ...

False claim of ghost image in CCTV | सीसीटीव्हीमधील भुताच्या प्रतिमेचा दावा फोल

सीसीटीव्हीमधील भुताच्या प्रतिमेचा दावा फोल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी येथील चाफले लेआउटमध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली भुताची प्रतिमा असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नाना तऱ्हेच्या चर्चांना पेव फुटले आहे. मात्र, हा नजर आणि मतिभ्रम असल्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सिद्ध करीत या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे.

भूत ही संकल्पना केवळ कल्पनाविलास आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अधामधात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भूत म्हणा वा आत्म्याच्या अस्तित्वाचे परीक्षण केले जात आहे. मात्र, त्याची सत्यता अजूनही सिद्ध झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर अजनी येथील चाफले लेआउटमधील एका कुटुंबाला भूत दिसल्याच्या चर्चेवर पडदा पाडण्याचे प्रयत्न अंनिसचे महासचिव हरीश देशमुख यांनी केले. संबंधित भूतग्रस्त घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये १९ जुलै रोजी रात्री १२.३६ वाजता एक प्रतिमा कैद झाली. ती भूत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी कोण्या एका मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे, ही प्रतिमा आणि ती आत्महत्या करणारी मुलगी, असा भ्रम पसरून संबंधित कुटुंबाची ही स्थिती झाल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात भोपाळ येथील सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचे विक्रेते विवेक रत्नाकर यांच्याशी बोलणे झाले असता, सीसीटीव्हीपुढे पक्षी आला आणि तो उडाला तर रात्री ब्लॅक ॲण्ड व्हाइट अशी घोस्ट प्रतिमा तयार होते. ही घोस्ट प्रतिमा मानवी भुतासारखी भासते आणि भ्रम पसरतो, असे ते म्हणाले. या सगळ्या ठोकताळ्यावरून सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ती प्रतिमा हा केवळ भ्रम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अंनिसने ‘भूत दाखवा आणि २५ लाख रुपये बक्षीस घ्या,’ असे आवाहन केले. यावेळी अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, मनोचिकित्सक डॉ. राजेंद्र सारडा, अंनिसचे महानगर अध्यक्ष नीलेश पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.

Web Title: False claim of ghost image in CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.