योगेश पांडे, नागपूर: कामाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने एका रेस्टॉरेन्ट मालकाविरोधात षडयंत्र रचून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले व पोलीस कोठडीत जायला लावले. आरोपीने त्यासाठी मालकाच्या रेस्टॉरेन्टमध्ये बोगस शासकीय स्टॅम्प ठेवून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्याच्या कार्यालयातून धनादेश चोरी करून ते वटविण्याचा प्रयत्न केला. अटकेत असताना रेस्टॉरेन्ट मालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. बदला घेण्याची ही पद्धत पाहून सदर पोलीस ठाण्याचे पथकदेखील हैराण झाले आहेत.
अक्षय अश्विन लिम्बना (वय ३९, माऊंट रोड, सदर) असे अडकविलेल्या रेस्टॉरेन्ट मालकाचे नाव आहे. त्यांचे माऊंटरोडवरील नवरत्न राघव हे हॉटेल आहे. ४ एप्रिल रोजी एका खबऱ्याने पोलिसांना यांना फोन करून नवरत्न राघव या हॉटेलच्या स्वयंपाकघरात अनेक बोगस स्टॅम्प असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे पोलिसांनी पाहणी केली असता शासकीय कार्यालयांचे २१ बोगस रबर स्टॅम्प आढळून आले होते.
पोलिसांनी अक्षय यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अक्षय अटकेत असताना ७ एप्रिल रोजी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील विविध बँकांचे धनादेश चोरी गेल्याचे तसेच ते वटविण्याचे प्रयत्न झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यावरून सेंट्रल एव्हेन्यू येथील इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंक येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक अनोळखी व्यक्ती दिसला. पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो एका पिवळ्या रंगाच्या मोटारसायकलवर साथीदारासोबत आल्याचे दिसले. ती मोटारसायकल सत्तार कुतीबुद्दीन अन्सारी (४२, भांडे प्लॉट, उमरेड मार्ग) याची असल्याची बाब अक्षय यांनी ओळखली. मात्र त्यांना त्याचा पत्ता माहिती नव्हता व मोबाईल फोन बंद येत होता. खबऱ्यांच्या माध्यमातून त्याचा शोध काढत पोलिसांनी त्याला ६ मे रोजी माऊंट रोडवरून ताब्यात घेतले.
म्हणून रेस्टॉरेन्ट मालकाला अडकविलेसत्तारची चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला. अक्षय लिम्बना यांनी हॉटेल नवरत्न राघव याचे नुतनीकरणाचे काम केले होते. तसेच माऊंट रोड येथे चालु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी देखील विविध छोटी मोठी कामे कामगारांच्या मदतीने केली होती. मात्र पैसे वेळेवर न दिल्याने सत्तारकडे काम करणारे कामगार कामाला यायला तयार नव्हते. यामुळे सत्तारने पंकज रहांगडाले याच्यासोबत मिळून अक्षय यांना अडकविण्याचा कट रचला व खोटे स्टॅम्प रेस्टॉरेन्टच्या स्वयंपाकघरात ठेवले. त्याने पंकजच्या साथीने चोरलेल्या धनादेशांवर बोगस स्वाक्षरी करत ते वटविण्याचा प्रयत्न केला. त्यातच तो अडकला. पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून पंकजचा शोध सुरू आहे.
सत्तार कुख्यात अपराधीआरोपी सत्तार हा कुख्यात अपराधी आहे. त्याच्याविरोधात चोरी, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याने नकली स्टॅम्प कुठून बनविले याचा शोध सुरू आहे.