तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला

By Admin | Updated: January 16, 2015 01:02 IST2015-01-16T01:02:36+5:302015-01-16T01:02:36+5:30

न्यु सुभेदार सुदर्शन ले-आऊट येथील रहिवासी सूरज अनिल सिरमोरिया (२४) नावाचा युवक पतंग पकडण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली

Falling down from the third floor | तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला

तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला

नागपूर : न्यु सुभेदार सुदर्शन ले-आऊट येथील रहिवासी सूरज अनिल सिरमोरिया (२४) नावाचा युवक पतंग पकडण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मेडिकलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूरजची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुयाब सुरेश मेश्राम ही ११ वर्षीय मुलगी पतंग उडवित असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. तिच्या कमरेला मार लागला असून उपचार सुरू आहेत.
वाहतुकीस अडथळा
शहरातील रस्त्यावर कटून पडलेला मांजा अचानक दुचाकी चालकांच्या समोर आल्यामुळे त्यांना आपली वाहने उभी करावी लागली. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अनेक नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समोर मांजा तर नाही ना, हे पाहूनच वाहन चालविताना दिसले. तर बहुसंख्य वाहनचालकांनी अचानक मांजा समोर आल्यास दक्षता म्हणून गळ्याला आणि तोंडाला रुमाल बांधून वाहन चालविणे पसंत केले.
शहरभर मांजाच मांजा
शहरातील अनेक भागात पतंगाचा मांजा रस्त्यावर पडलेला दिसला. अनेक युवक, नागरिक हा मांजा गोळा करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले तर अनेक ठिकाणी हा मांजा वाहनांच्या पुढे आल्यामुळे वाहनचालकांना बचाव करून पुढे जाण्याची कसरत करावी लागली. महाल, गणेशपेठ, मानेवाडा, धरमपेठ, इंदोरा, इतवारी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी मांजा पडला होता. हा मांजा गोळा करण्यासाठी अनेकजण धावपळ करताना दिसले.
जखमा होतात निष्पापांनाच
पतंगबाजीचा खेळ म्हणजे कापाकापीची स्पर्धा. पतंग उडविणारा ‘ओ काट्’च्या आरोळ्या ठोकत राहतो, पतंग पकडणारा त्यामागे सर्व जग विसरून धावतो. पण यात बळी जातो किंवा जखम होते तो कुठलाही संबंध नसलेल्या निष्पापांनाच. कापाकापीची जीवघेणी स्पर्धा सुरू असताना पोलीस मात्र मूकबधिर बनले असतात.
पतंग पकडण्यासाठी युवकांची धाव
शहरात काटलेले अनेक पतंग उडत दूरवर जाऊन खाली पडत होते. हे पतंग अनेकदा शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन पडले. हे पतंग पकडण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केली. पतंग पकडण्याच्या नादात अनेकदा रस्त्यावरून वाहन येत आहे, याचे भान या युवकांना नव्हते. त्यामुळे अनेक चौकात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. रस्त्यावर पतंग पडताना दिसला की वाहनचालक तो पतंग पकडण्यासाठी अचानक वाहनासमोर येईल या भीतीने हळुवार वाहने चालविताना दिसले. (प्रतिनिधी)
मांजामुळे कापली तीन बोटे
उत्तर नागपुरातील दहा नंबल पुलाजवळ रस्ता ओलांडत असताना एका ३२ वर्षाच्या युवकाची मांज्यामुळे तीन बोटे कापली गेली. दुपारी रस्त्यावर रक्ताने माखलेल्या अवस्थेतील या युवकाला पाहून इतर वाहनचालक पुढे जात होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते दुपारी ३.१५ वाजता टेका नाका येथील रहिवासी वैभव खापर्डे आपल्या कारने नागसेननगर शाळेजवळ पोहोचले. ते आपली कार उभी करून दुसऱ्या टोकाकडे पेट्रोल पंपाच्या दिशेने रस्ता ओलांडत होते. दरम्यान एका कटलेल्या पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला लागला. त्यांनी तो मांजा आपल्या उजव्या हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु मांजा जोरात ओढल्यामुळे त्यांच्या हाताची तीन बोटे कापली गेली.

Web Title: Falling down from the third floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.