भूमाफियांनी बनवली बनावट रजिस्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:06+5:302021-02-05T04:56:06+5:30
जगदीश जोशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खून-हप्ता वसुली यासारखे गुन्हे सोडून नागपुरातील गुन्हेगार आता भूमाफियाची टोळी चालवू लागले ...

भूमाफियांनी बनवली बनावट रजिस्ट्री
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खून-हप्ता वसुली यासारखे गुन्हे सोडून नागपुरातील गुन्हेगार आता भूमाफियाची टोळी चालवू लागले आहेत. अशीच एक टाेळी बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या टोळीतील सूत्रधारासह सहा सदस्यांना अटक केली.
नरेंद्र उर्फ नारू नांदुरकर (३६) रा. वाठोडा, प्रमोद शेंडे (३५) रा. त्रिशरण चौक, पंडित तिवारी (३०) रा. राकेश ले-आउट, योगेश ऊर्फ गोचा दिलीप मेश्राम (३५) राय इंदोरा, बाल्या ऊर्फ प्रकाश अनसेटवार (३५) आणि सुषमा सत्यजीत इंदूरकर (३५) रा. बालाजीनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
कविता नगरारे (घरडे) या दिल्ली येथे डॉक्टर आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी बेलतरोडी ठाणे परिसरात प्लाॅट खरेदी केला होता. लग्नानंतर त्या दिल्लीत राहू लागल्याने नागपुरात त्यांचे येणे-जाणे कमी झाले. काही दिवसांपूर्वी त्या नागपुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांच्या प्लाॅटवर दुसऱ्याच कुण्या व्यक्तीने घराचे बांधकाम सुरू केल्याची माहिती मिळाली. कविता यांना धक्काच बसला. त्यांनी आपला प्लाॅट कुणालाही विकला नव्हता. त्यांनी माहिती काढली. तेव्हा एका महिलेने डॉ. कविता घरडे बनून प्लाॅट विकल्याचे त्यांना समजले. त्यांनी लगेच बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा बोगस महिलेने प्लाॅट विकल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या बोगस विक्री प्रकरणात आरोपींनी अतिशय सराईतपणे काम केल्याचे दिसून आले. त्यांनी दुय्यम उपनिबंधक कार्यालयातून डॉ. कविता यांच्या प्लाॅटची डुप्लिकेट रजिस्ट्री मिळवली. या आधारावर सुषमा इंदूरकर हिला डॉ. कविता घरडे बनवून सादर केले. यासाठी बोगस आधार कार्ड आणि पॅन कार्डही तयार केले. त्यानंतर सुषमाला कविता बनवून प्लाॅटची विक्री केली.
बेलतरोडी पोलिसांनी सुषमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने नारू ऊर्फ नरेंद्र आणि इतर आरोपींच्या इशाऱ्यावर हे काम केल्याचे सांगितले. पोलिसांनी नारू व त्याच्या साथीदाराला अटक केली. नारू, योगेश ऊर्फ गोचा, बाल्या ऊर्फ प्रकाश आणि पंडित तिवारी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी वसुली, मारहाण आदी गुन्हे दाखल आहेत. नागरिकांमध्ये त्यांची दहशत आहे. या धंद्यात नेहमी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची भीती राहत होती. त्यामुळे हे गुन्हेगारांनी भूमाफिया बनले. बेलतरोडी व हुडकेश्वर परिसरात अनेक नवीन काॅलनी तयार झाल्या आहेत. लोक गुंतवणूक किंवा घर बांधण्याच्या उद्देशाने प्लाॅट खरेदी करून ठेवत आहेत. प्लाॅट मालक दुसऱ्या ठिकाणी राहतात. याचा फायदा घेऊन आरोपी मोकळ्या जागेवर कब्जा करून त्याची विक्री करतात. पीडित पोलिसांकडे जातो तेव्हा लगेच कारवाई होण्याऐवजी तक्रारींची माहिती घेण्याचे आश्वासन दिले जाते. अशा परिस्थतीत अनेक पीडित नाइलाजास्तव भूमाफियाशी समझोता करण्यास तयार होतात. त्यांना कब्जा हटवण्याची किमत द्यावी लागते. अन्यथा भूमाफिया स्वस्तात जमीन विकून टाकतात.
दुसरा सूत्रधार निसटला
नारू नांदुरकरनंतर या टोळीचा सूत्रधार स्वप्निल नावाचा गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. त्याने मनीषनगर, बेसा, हजारी पहाड, काटोल नाका परिसरातील जमिनीच्या वादात कोट्यवधी रुपये कमावले आहेत. या प्रकरणातही त्याची मुख्य भूमिका आहे. परंतु आरोपी त्याचे नाव सांगत नाही आहेत. आरोपी ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी स्वप्निलच्या मदतीने अनेक जमिनींवर कब्जा करून संपत्ती जमवली आहे. या प्रकरणातून स्वप्निल निसटल्याने अनेक गोष्टी पुढे येऊ शकणार नाही.