लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमिनींच्या विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला. या रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. यात काही भूमाफिया समाविष्ट आहेत. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या टोळीने आणखी काही सरकारी जमिनींमध्ये असाच गैरव्यवहार केल्याची शक्यता असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
जफर उल्ला खान हफिजुल्ला खान (बंगाली पंजा, इतवारी), शादाब खान ऊर्फ हिदायतुल्लाह खान (बंगाली पंजा, इतवारी) व वकील अहमद अब्दुल करीम शेख (अड्याळ, पवनी, भंडारा), अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार शाहनवाज आलम हकीम अन्सासारी यांनी २०१० मध्ये आरोपींकडून मौजा भांडेवाडी येथे प्लॉट विकत घेतला होता. मात्र, २०१७ मध्ये आरोपींनी त्यांना मोजणीत जमीन जास्त निघाली असल्याचे सांगितले. त्यामुळे अंसारी यांनी त्याच जमिनीतील दुसरा प्लॉटदेखील विकत घेतला. दरम्यान, त्या ले आउटमधील सर्व प्लॉट विकले गेले व लोकांनी घर बांधले. शेतजमिनीच्या मोजणीत आणखी ४४ प्लॉट निघाल्याची बतावणी आरोपींनी केली व अंसारी यांनी आणखी दोन प्लॉट बुक करत पैसे दिले. काही दिवसांनी आरोपी अंसारी यांना भेटले व चांदमारी मार्गावर तीन प्लॉट रिकामे असल्याचे सांगितले. त्यामुळे अंसारी व त्यांचे मित्र शहजादा अंसारी यांनी १.०९ कोटींमध्ये करारनामा केला. त्यांनी आरोपींना ५२ लाख रुपये दिले. ६ जानेवारी २०२५ रोजी तेथे नासुप्रचे अतिक्रमण काढणारे पथक पोहोचले व त्यांनी ती जागा नासुप्रची असल्याचे सांगितले. अंसारी यांनी माहिती काढली असता ती जागा खरोखरच कचरा संकलनासाठी राखीव ठेवल्याची बाब समोर आली, तसेच अगोदर बुक केलेल्या प्लॉटची रजिस्ट्री साहील शेखच्या नावावर असल्याचेदेखील स्पष्ट झाले. जफरुल्लाह खान याने ऑक्टोबर २०२३ मध्ये ती रजिस्ट्री करून दिली होती.
आरोपी व साईरत्न डेव्हलपर्सने खासरा क्रमांक ११६/१, ११७/२ व ११७/१ मध्ये प्लॉट पाडून अनेकांना त्याची विक्री केली. आरोपींनी तीन कोटींहून अधिकची फसवणूक केली. अंसारी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे, शरद कोकाटे, विजय गुरपुडे, उपेंद्र तायडे, सुषमाकर जांभूळकर, इशांक आटे, योगेश निघोट यांच्या पथकाने ही कारवाई केली.