तोतया शासकीय कंत्राटदाराने पेंट घेऊन लावला आठ लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:17 IST2019-06-25T22:15:54+5:302019-06-25T22:17:07+5:30
दत्तात्रयनगरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाकडून आठ लाखांचा पेंट विकत घेऊन तोतया शासकीय कंत्राटदाराने त्यांना चुना लावला.

तोतया शासकीय कंत्राटदाराने पेंट घेऊन लावला आठ लाखांचा चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दत्तात्रयनगरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाकडून आठ लाखांचा पेंट विकत घेऊन तोतया शासकीय कंत्राटदाराने त्यांना चुना लावला. राजू मधुकरराव नानोटकर (वय ४२) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
नानोटकर दत्तात्रयनगरात राहतात. त्यांचे बिडीपेठ सक्करदरात शैला सेल्स कॉर्पोरेशन नावाने दुकान आहे. ते पेंट आणि हार्डवेअरचा व्यवसाय करतात. १४ डिसेंबर २०१८ ला त्यांना एक फोन आला. मेसर्स क्रिएटिव्ह मार्केटिंग कंपनीचा व्यवस्थापक विशालकुमार आणि प्रोप्रायटर सुरेश देसाई असे नाव सांगणारे दोन व्यक्ती त्यांच्यासोबत बोलले. त्यांनी धंतोलीतील सिल्व्हर पॅलेसमध्ये आमचे कार्यालय असून, आम्ही शासकीय कंत्रादार आहोत. एक मोठे कंत्राट आम्हाला मिळाल्याचे त्यांनी नानोटकरांना सांगितले. आम्हाला एशियन पेंटचे २० लिटरचे ७५ आणि डिलक्स पेंटचे २० लिटरचे १०५ डबे विकत घ्यायचे आहे, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून दरपत्रक मागवून घेतले. खरेदीचा दर (रेट) पक्का झाल्यानंतर १५ दिवसांत धनादेशाच्या माध्यमातून पेमेंट करू, या अटीवर आरोपींनी पेंट खरेदी करायचा आहे, असे सांगितले. नानोटकर यांनी त्यांना पाहिजे असलेल्या पेंटस्बाबत ई-मेल करण्यास सांगितले. त्यानुसार आरोपींनी १७ डिसेंबरला नानोटकर यांना मेल केला. त्यानंतर आरोपींनी एका व्यक्तीला (आॅफिस बॉय) नानोटकर यांच्याकडे खरेदीचे पत्र पाठवून माल देण्यास सांगितले. त्यानुसार नानोटकर यांनी विशालकुमार तसेच सुरेश देसाईने सांगितलेल्या पत्त्यावर पेंटस्चे डबे पाठविले. २० डिसेंबरला नानोटकर यांच्याकडे काम करणाऱ्याने आरोपींच्या कार्यालयात पेंटस्चे एकूण ७ लाख ९१ हजारांची दोन बिलं नेऊन दिली. यावेळी आरोपी विशालकुमारने त्याच्याजवळ आयडीबीआय बँक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर शाखेचे दोन वेगवेगळ्या रकमेचे धनादेश फिर्यादीच्या कर्मचाºयाकडे दिले. ठरल्याप्रमाणे नानोटकर ते धनादेश विड्रॉल करण्यासाठी बँकेत जमा करण्याच्या तयारीत असताना आरोपी विशालकुमारचा ६ जानेवारी २०१९ ला नानोटकरांना फोन आला. यावेळी त्याने एक आठवडा थांबा, चेक बँकेत जमा करू नका, अशी विनंती केली. त्यानंतर १२ जानेवारीला पुन्हा त्याचा फोन आला. याहीवेळी त्याने चेक बँकेत जमा करू नका, अशी विनंती केली. त्यामुळे नानोटकरांना शंका आली.
त्यांनी आरोपी क्रमांक दोन देसाई याच्याशी संपर्क केला असता त्याने मी आजारी असून रायपूरला आहे, तुम्ही आणखी दोन-तीन दिवस थांबा अशी विनंती केली. अशा प्रकारे बरेचवेळा आरोपींनी टाळाटाळ केली. ११ फेब्रुवारी २०१९ ला नानोटकर यांनी हे धनादेश बँकेत जमा केले. मात्र, आरोपींच्या खात्यात रक्कमच नसल्याने ते बाऊन्स झाले. त्यानंतर आरोपींनी नानोटकरांसोबत संपर्क तोडला. ते त्यांच्या कार्यालयातही आढळले नाही.
घर आणि गोदामही कागदावरच!
आरोपी देसाईने आपण प्रतापनगरात राहतो, असे सांगितले होते. त्यामुळे नानोटकरांनी आरोपीच्या पत्त्यावर, प्लॉट नंबर ७६, वत्सल अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ३, प्रतापनगर येथे जाऊन चौकशी केली असता तेथे सुरेश देसाई नावाची कोणतीही व्यक्ती राहत नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी वाडीला गोदाम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नानोटकर यांनी वाडीत ठिकठिकाणी चौकशी केली. मात्र, तिकडे क्रिएटीव्ह कंपनीचे गोदाम कुठेही आढळले नाही. आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नानोटकर यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.