नकली नोटा छापणारे मोकाट

By Admin | Updated: September 8, 2014 02:18 IST2014-09-08T02:18:09+5:302014-09-08T02:18:09+5:30

खुद्द एका पोलीस निरीक्षकाने केलेल्या तपासातील त्रुटींमुळे नकली नोटा छापून चलनात आणणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला ...

Fake currency raids | नकली नोटा छापणारे मोकाट

नकली नोटा छापणारे मोकाट

नागपूर : खुद्द एका पोलीस निरीक्षकाने केलेल्या तपासातील त्रुटींमुळे नकली नोटा छापून चलनात आणणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविणारे दोन आरोपी मोकाट सुटले. सबळ पुराव्याअभावी या आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एन. टी. घोटेकर यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
प्रवीण सुरेश सिरसाट (२२) रा. आकाशनगर, हुडकेश्वर रोड आणि विक्की ऊर्फ शुभम अशोक शाहू (२३) रा. सेनापतीनगर दिघोरी, अशी आरोपींची नावे आहेत.
सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, गुप्त खबऱ्यानुसार अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. पी. दाभाडे यांनी २२ डिसेंबर २०१२ रोजी तुकडोजी चौकातील एसएनडीएलच्या उपकेंद्रानजीकच्या बब्बूभाई पानठेल्यासमोर प्रवीणला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकाच क्रमांकाच्या १०० च्या १५ नोटा जप्त केल्या होत्या. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सावित्रीबाई झोपडपट्टीतील हिरा मेश्राम याच्या घरावर धाड घालून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विक्की शाहू याच्याकडून दोन स्कॅनर प्रिंटर, १०० च्या एकाच क्रमांकाच्या ७ बनावट नोटा, एक खरी नोट, १० च्या एकाच क्रमांकाच्या चार नोटा, एक खरी नोट, कागदावर प्रिंट खराब आलेल्या नोटा, कटर, स्केल, कोरे कागद आदी साहित्य जप्त केले होते.
प्रकरण नकली नोटांचे असल्याने पोलीस निरीक्षक बी. पी. साळुंके यांनी तपास स्वत:कडे घेतला होता. त्यांनी जप्त नकली नोटा परीक्षणासाठी नाशिक येथे पाठविल्या होत्या. परंतु साळुंके यांनी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. नकली नोटांच्या संदर्भातील पोलीस स्टेशन डायरीवरील नोंदी आणि लॉगबुक नोंदी न्यायालयात सादर केल्या नव्हत्या. गंभीर त्रुटींची ही बाब बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.
न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. पोलीस तपासातील या त्रुटींचा लाभ आरोपींना मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पराग उके, तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Fake currency raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.