रेल्वेत बनावट ताक अन् पाणी बाटल्यांची धडाक्यात विक्री उन्हाळ्यातील गर्दी : अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मोहिम अधिक तीव्र

By नरेश डोंगरे | Updated: March 27, 2025 23:56 IST2025-03-27T23:56:18+5:302025-03-27T23:56:44+5:30

विविध रेल्वे गाड्यांमध्ये शिरून प्रवाशांना बिनबोभाट नकली ताक (छाज) आणि बाटलीबंद पाणी विकण्यात येत आहे.

Fake buttermilk and water bottles on sale in trains, summer rush: Campaign against unauthorized vendors intensified | रेल्वेत बनावट ताक अन् पाणी बाटल्यांची धडाक्यात विक्री उन्हाळ्यातील गर्दी : अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मोहिम अधिक तीव्र

रेल्वेत बनावट ताक अन् पाणी बाटल्यांची धडाक्यात विक्री उन्हाळ्यातील गर्दी : अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मोहिम अधिक तीव्र

नरेश डोंगरे - नागपूर 

नागपूर :
विविध रेल्वे गाड्यांमध्ये शिरून प्रवाशांना बिनबोभाट नकली ताक (छाज) आणि बाटलीबंद पाणी विकण्यात येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अनधिकृत वेंडर्सविरुद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार, गेल्या आठवडाभरात ७५ वेंडर्स पकडण्यात आले.

उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. तीव्र उन्हामुळे आणि गर्दीमुळे प्रवाशी वारंवार पाणी तसेच छाजची मागणी करीत असल्याचे ध्यानात घेऊन अनधिकृत विक्रेते त्यांना कंपनीच्या नावे बनावट छाज तसेच बिसलरीसारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या बाटल्या विकतात. रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाड्यांमध्ये केवळ 'रेल नीर' हेच बाटलीबंद पाणी विकले जावे, असा दंडक असताना अनेक वेंडर्स रेलनीर ऐवजी दुसऱ्याच पाण्याच्या बाटल्या विकतात. त्यासंबंधाने तक्रारी येत असल्याने रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी नागपूर-इटारसी, नागपूर-बडनेरा आणि नागपूर-बल्लारशाह या प्रमुख मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आली. या पथकांकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईच्या मोहिमेमुळे एका आठवड्यात ७५ वेंडर्स पकडण्यात आले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.

विविध रेल्वे स्थानकांवर नजर

बनावट ताकाच्या पॅकेट्स आणि गैर-रेलनीर पाण्याच्या बाटल्यांतील पाणी तसेच अन्य अनधिकृत खाद्यपदार्थ प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे नागपूर, बल्लारशाह, बैतूल, वर्धा आणि सेवाग्राम या प्रमूख रेल्वे स्थानकांवरही कडक नजर ठेवली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहिम संपूर्ण उन्हाळाभर सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

अन्न पदार्थांच्या नमुन्यांचीही तपासणी

विविध रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री स्टॉल्समधील खाद्यांच्या नमुन्यांची तपासणी केली जात असून, त्यांना प्रयोगशाळेत पाठवून गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही खातरजमा केली जात आहे. प्रवाशांनी सतर्क राहून खानपान विकणारांचा संशय आल्यास रेल्वे प्रशासनास त्वरित कळवावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Web Title: Fake buttermilk and water bottles on sale in trains, summer rush: Campaign against unauthorized vendors intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.