लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कंपन्यांच्या नावाखाली बनावट जीएसटी बिले बनवून शेकडो कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. हे प्रकरण काहीसे थंडबस्त्यात गेल्यावर हे रॅकेट परत सक्रिय झाले आहे. जुन्या रॅकेटचा सूत्रधार बंटी साहूच्या टोळीशी संबंधित सदस्यच हे नवीन रॅकेट चालवत आहेत.
गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. ११३ डमी कंपन्यांच्या नावाने शेकडो कोटी रुपयांची बनावट जीएसटी बिले बनविण्यात आली होती. यात सिमेंट, लोखंड, भंगार इत्यादी वस्तूंची खरेदी-विक्री दाखविण्यात आली. प्रत्यक्षात वस्तूंची खरेदी किंवा विक्री झालीच नव्हती. या रॅकेटचा सूत्रधार बंटी साहू, त्याचा भाऊ जयेश साहू, ब्रिजकिशोर मणियार, ऋषी लखानी आणि आनंद हरडे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचे साथीदार राजेश साहू, अविनाश साहू आणि अंशुल मिश्रा फरार झाले होते. तपासादरम्यान, पोलिसांना आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे सापडले. मणियारला जामिनावर सोडण्यात आले आहे तर मिश्राला काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला. मणियार आणि मिश्रा यांची सहज सुटका झाल्यामुळे बनावट बिलिंग रॅकेटचे सदस्य पुन्हा सक्रिय झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंजारी ले-आऊट येथील एक फर्म देवरी आणि चंद्रपूर येथील दोन फर्म्सना बनावट बिल विकत आहे. रोहित आणि अंबरीश हे या कंपनीचे संचालक आहेत. खरा सूत्रधार तुरुंगात आहे. या कंपनीचे टेलिफोन एक्सचेंज चौकातील एका खासगी बँकेत खाते आहे. बनावट बिलिंगमध्ये सहभागी असलेली दुसरी मोठी कंपनी कळमना रोडवरील अभिनव घरकुल कॉम्प्लेक्सजवळ आहे. या कंपनीच्या सूत्रधारांनी मुंबईतील उद्योगपतींसह अनेक मोठ्या लोकांचा कोट्यवधी रुपयांचा दंड वाचवून दिला आहे. पोलिसांनी या दिशेने तपासही केलेला नाही. या रॅकेटमध्ये अनेक सरकारी अधिकारी सामील आहेत.
बँक अधिकारी आणि हवाला ऑपरेटरवर कारवाई नाहीचया रॅकेटअंतर्गत शेकडो बँक खाती भाड्याने घेण्यात आली होती. ही खाती मोमीनपुरा येथील रियाझ ऊर्फ मामू आणि वर्धमान नगर येथील तन्ना यांनी मास्टरमाइंड बंटीला दिली होती. या बदल्यात त्यांना मोठे कमिशन मिळत असे. गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला तरी दोघांवरही कोणतीही कारवाई झालेली नाही. या रॅकेटमध्ये आरोपींच बँक अधिकारी आणि शहरातील काही मोठे हवाला ऑपरेटरही सहभागी होते. त्यांच्यावरदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही.