नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:05 IST2019-11-29T20:55:47+5:302019-11-29T22:05:28+5:30
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लेटलतिफपणा अद्यापही कायमच आहे. आता तर चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातच विद्यापीठाने हलगर्जीपणा दाखविला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब हे चित्र संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर दिसून येत आहे. विद्यापीठाला मराठी संकेतस्थळाकडे इतके दुर्लक्ष सुरू आहे का असा प्रश्नदेखील यातून उपस्थित होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातूनच शिक्षण घेतले होते. २०१४ साली ते मुख्यमंत्री झाले व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले. सलग दुसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्रीदेखील झाले. परंतु आवश्यक संख्याबळ नसल्याने २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी राजिनामा दिला व २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अशा स्थितीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फडणवीस यांच्या उल्लेखासमोर माजी मुख्यमंत्री असा बदल करणे अपेक्षित होते. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही तेच मुख्यमंत्री असल्याचे मुख्य पृष्ठावरच दिसून येत आहे. ‘लोकमत’या या अगोदर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील विविध त्रुटी समोर आणल्या आहेत. यात विद्यापीठाकडून उशीराने सुधारणा करण्यात आली. मात्र वारंवार असे प्रकार दिसून येत आहेत. यासंदर्भातील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
‘सीएसआयआर’चे महासंचालक कोण ?
याचप्रमाणे इतरही माजी विद्यार्थ्यांसंदर्भात विद्यापीठाने काळानुरुप बदल केलेले नाही. उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत ‘सीएसआयआर’चे (कॉन्सिल ऑफ सायंटिफीक अॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) माजी महासंचालक डॉ.एम.ओ.गर्ग यांचा अद्यापही महासंचालक म्हणूनच उल्लेख आहे. डॉ.गर्ग हे २४ ऑगस्ट २०१८ पर्यंतच ‘सीएसआयआर’चे महासंचालक होते. विशेष म्हणजे सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी डॉ.शेखर मांडे हे ‘सीएसआयआर’चे महासंचालक आहेत. त्यांच्या नावासमोर मात्र तसा उल्लेख कुठेही नाही.