मर्सिडीज अपघातग्रस्तांसाठी आंदोलनादरम्यान फडणवीसांचा पुतळा जाळला, युथ कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: March 1, 2024 19:17 IST2024-03-01T19:17:44+5:302024-03-01T19:17:56+5:30
आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मर्सिडीज अपघातग्रस्तांसाठी आंदोलनादरम्यान फडणवीसांचा पुतळा जाळला, युथ कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : धनाढ्य कुटुंबातील महिलांच्या भरधाव मर्सिडीजच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
२४ फेब्रुवारीच्या रात्री रामझुल्यावर एमएच ४९ एएस ६१११ या कारने दुचाकीवरील दोन तरुणांना धडक दिली. त्यात मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३२, जाफरनगर, अवस्थी चौक) यांचा मृत्यू झाला, तर माधुरी शिशिर सारडा (३७, वर्धमान नगर) व रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (३९, देशपांडे ले आऊट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कार रितिका चालवत होती. अटक झाल्यावर रितिकाची जामिनावर सुटकादेखील झाली होती. पोलिसांनी रक्ताचे नमुने घेऊन ते प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. अहवालानुसार महिलांनी मद्यप्राशन केल्याची बाब स्पष्ट झाली.
मृतकांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी गुरुवारी दुपारी अडीच वाजता भगवाघर चौक ते मेयो इस्पितळ चौकाजवळील शनी मंदिराजवळ युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आले. गृहमंत्री फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात युथ कॉंग्रेस महासचिव स्वप्निल ढोकेसह सागर चव्हाण (महाल), सोहेब शेख (भालदारपुरा), सलीम राजा शेख (मोमीनपुरा), शेख अब्दुल मोईज उर्फ अब्दुल अजीज (मोमीनपुरा) व इतर पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.