लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:16 IST2021-07-16T11:13:00+5:302021-07-16T11:16:29+5:30

सध्या नागपूरकरांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज (प्रतिपिंडे) तपासणी ‘फॅड’ वाढले आहे. कोरोना झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर अधिक प्रमाणात अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्याचे चारचौघांत फुशारकी मारणारे महाभाग दिसून येत आहे.

Fad of testing Antibodies increase in Nagpur | लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’

लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’

ठळक मुद्देरोज ४० ते ५० नागपुरकर करतात तपासणी अहवाल पाहून अनेक जण बिंधास्त

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कोरोना होऊन गेल्यानंतर किंवा लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अनेक जण अ‍ॅण्टिबॉडीज (प्रतिपिंडे) तपासणी करून घेत आहेत. सध्या नागपूरकरांमध्ये ही तपासणी करण्याचे ‘फॅड’ वाढले आहे. कोरोना झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर अधिक प्रमाणात अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्याचे चारचौघांत फुशारकी मारणारे महाभाग दिसून येत आहे. काही जण बिनधास्तपणे वावरताना दिसून येत आहे. मात्र, अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्यातरी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आपत्कालीन वापरासाठी ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ व नुकतेच ‘स्पुटनिक ’ लस उपलब्ध झाली आहे. शासकीय व खासगी केंद्राचा लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १,८१,७४९ रुग्ण आढळून आले होते. आता याला तीन महिन्यांचा कालावधी होत असल्याने व धोका टळल्याने आपल्या शरीरात किती अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्या याची तपासण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण १४ दिवसांनंंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासण्याऱ्यांचीही संख्या वाढली आहे. खासगी प्रयोगशाळेनुसार रोज ४० ते ५० या तपासण्या होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्येकाने ही तपासणी गरजेचे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लस उत्पादन कंपनीचे वेगवेगळे मापदंड

लाइफलाईन लॅबचे संचालक डॉ. हरीश वरभे म्हणाले, लसीकरणामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून कोरोना होण्याची शक्यता कमी होते. कोरोना झाला तरी त्यांची गंभीरता किंवा व्हेंटिलेटवर जाण्याची शक्यताही कमी होते. समूह संसर्गावर लसीकरणामुळे नियंत्रण येते. यामुळे तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. परंतु लसीकरणानंतर वाढलेल्या अ‍ॅण्टिबॉडीज पाहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करता सैराटपणे हुंदाळणे हे धोकादायक ठरू शकते. कारण, प्रत्येक लस उत्पादन कंपनीचे या संदर्भातील मापदंड वेगवेगळे आहेत. तसेच कोरोना विषाणूमध्ये बदल होत असल्याचे दिसूनही येत आहे. यामुळे लसीकरणानंतरही डबल मास्क घालणे, वारंवार हात धुणे व शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे.

-अ‍ॅण्टिबॉडीज तपासण्याचे वाढले प्रमाण

क्लिनिकेअर लॅबचे संचालक डॉ. राजकुमार राठी म्हणाले, कोरोना होऊन गेलेल्या किंवा दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात ‘आयजीजी अ‍ॅण्टिबॉडीज’ तपासणीचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, कुटुंबातील अनेक सदस्य एकत्र येऊन ही तपासणी करताना दिसून येत आहे.

-तपासणी गरजेची नाही

संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. नितीन शेंडे म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसनंतर अ‍ॅण्टिबॉडीज वाढतातच. यामुळे तपासणी करून घेणे गरजेचे नाही. महत्त्वाचे म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन कंपनी आपल्या लसीला घेऊन वेगवेगळे दावे करीत असले तरी त्याचा सखोल अभ्यास झालेला नाही. यामुळे खबरदारी घेणे व कोरोना होऊ न देणे हाच एकमेव पर्याय आहे.

Web Title: Fad of testing Antibodies increase in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.