मुलीच्या नावाखाली फेसबुक खाते, तर नोकरीच्या नावाखाली विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 21:28 IST2023-03-10T21:27:24+5:302023-03-10T21:28:16+5:30
Nagpur News फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून एका तरुणीशी मैत्री करून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मुलीच्या नावाखाली फेसबुक खाते, तर नोकरीच्या नावाखाली विनयभंग
नागपूर : फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून एका तरुणीशी मैत्री करून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पारडी येथील विजय ऊर्फ संजय देवानंद भानारकर (२५, संसारनगर, पारडी) याला अटक केली आहे.
संजय हा एका सॉ मिलमध्ये व्यवस्थापक आहे. त्याने फेसबुक तसेच व्हॉट्सॲपवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले होते. तो त्यावरून विद्यार्थिनी व तरुणींशी चॅटिंग करायचा. त्याने एका २० वर्षीय विद्यार्थिनीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविली. तिला मुलगी समजून विद्यार्थिनीने विजयसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. यानंतर संजयने विद्यार्थिनीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. आतापर्यंत अनेक बेरोजगारांना काम मिळवून देण्याचे सांगितले. यानंतर त्याने विद्यार्थिनीला स्वत:चा व्हॉट्सॲप क्रमांक देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. नोकरी लागावी यासाठी विद्यार्थिनीने संजयशी बोलणे सुरू केले.
४ मार्च रोजी संजयने तिला संगणक चालवण्याची माहिती देण्याच्या बहाण्याने पारडी येथे बोलावले. तेथे तिला एका खोलीत प्रशिक्षणाच्या नावाखाली नेले व तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर दुचाकी चालविण्यासंबंधी प्रश्न विचारले. त्यांना दुचाकी कशी चालवायची, हे शिकवण्याच्या बहाण्याने पुन्हा पवनगाव परिसरात नेऊन आक्षेपार्ह वर्तन केले. त्याच्या वागण्याने घाबरलेली विद्यार्थिनी परत आली. ५ मार्च रोजी विद्यार्थिनीने पारडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिला संजयच्या घराची किंवा पारडीच्या खोलीची माहिती नव्हती.
पोलिसांनी व्हॉट्सॲप क्रमांक आणि फेसबुक आयडीवरून तपास सुरू केला. त्यातून संजयचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयला महिलांशी मैत्री करण्याचा ‘चस्का’ आहे. त्याआधीही विद्यार्थिनीच्या धर्तीवर महिला किंवा मुलींना फसविल्याचा संशय आहे. पारडी पोलिसांनी पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, भरत शिंदे, उत्तम बेदूरकर यांनी ही कारवाई केली.