नागपूर जिल्ह्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २० हजार ज्येष्ठांसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 07:30 AM2021-05-15T07:30:00+5:302021-05-15T07:30:02+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात २०१९ - २०मध्ये ८,०३१ मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या असताना २०२० - २१मध्ये केवळ १,४८४ झाल्या. बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालये कोविडच्या रुग्णसेवेत असल्याने या शस्त्रक्रिया बंद पडून सुमारे २० हजार ज्येष्ठांसमोर अंधार निर्माण झाला आहे.

Eye surgery stalled in Nagpur district; Darkness in front of 20,000 elders | नागपूर जिल्ह्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २० हजार ज्येष्ठांसमोर अंधार

नागपूर जिल्ह्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २० हजार ज्येष्ठांसमोर अंधार

Next
ठळक मुद्देमोतिबिंदूचे रुग्ण अडचणीत २०१९ - २०मध्ये ८०३१, तर २०२० - २१मध्ये केवळ १४८४ शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क 

सुमेध वाघमारे

नागपूर : भारतात मोतिबिंदू हे अंधत्त्वाचे मुख्य कारण आहे. दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी साधारण ७२ टक्के आहे. मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्यासाठी सरकारने ‘मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली. परंतु कोरोनामुळे यावर पाणी फेरले गेले. नागपूर जिल्ह्यात २०१९ - २०मध्ये ८,०३१ मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या असताना २०२० - २१मध्ये केवळ १,४८४ झाल्या. बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालये कोविडच्या रुग्णसेवेत असल्याने या शस्त्रक्रिया बंद पडून सुमारे २० हजार ज्येष्ठांसमोर अंधार निर्माण झाला आहे.

मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्ट्रात मोतिबिंदू रुग्णांच्या सुमारे १५ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे ३ लाख रुग्णांवर तातडीने मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ‘एनजीओ’ व खासगी हॉस्पिटल्सना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष दिले जाते. २०१८ - १९ या वर्षात नागपूर जिल्ह्याला ६,२११ मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष देण्यात आले होते. त्या तुलनेत १४८ टक्के शस्त्रक्रिया करून नागपूर जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान निर्माण केले होते. परंतु मार्च २०२०पासून कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात होताच मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया मागे पडल्या. मेयो, मेडिकल, डागासह इतरही शासकीय रुग्णालयात २०१९ - २० या वर्षात ८०३१ शस्त्रक्रिया झाल्या असताना २०२० - २१मध्ये केवळ १,४८४ शस्त्रक्रिया झाल्या. एकूणच १८.४७ टक्क्याने मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया कमी झाल्या. याचा फटका गरीब व सामान्य मोतिबिंदूच्या रुग्णांना बसला आहे.

-मोतिबिंदू रुग्णांचे सर्वेक्षणही बंद

आरोग्य विभागाकडून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मोतिबिंदूच्या रुग्णांचे होणारे सर्वेक्षण कोरोनामुळे बंद आहे. यामुळे मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेची किती रुग्णांना गरज आहे, हा आकडा अद्याप प्रशासनाकडे उपलब्ध नाही. परंतु तज्ज्ञांनुसार नागपूर जिल्ह्यात मोतिबिंदूचे सुुमारे २० हजारांवर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

-शासकीय, खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया ठप्प

प्राप्त माहितीनुसार, कोरोनापूर्वी नागपूर जिल्ह्यातील ‘एनजीओ’कडून २२ हजार, तर खासगी रुग्णालयाकडून मोतिबिंदूच्या ३३ हजार शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु कोरोनाच्या काळात ‘एनजीओ’चे कार्य बंद पडल्यामुळे, तर शासकीय व खासगी रुग्णालये कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत केल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत.

- नेत्ररोग विभागाचा वॉर्डच कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत

मेयोच्या नेत्र रोग विभागाचा वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आहे. मार्च २०२०पासून कोरोनाचे रुग्ण आढळून येताच या कॉम्प्लेक्सचे रुपांतर ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’मध्ये करण्यात आले. यामुळे मोतिबिंदूच नव्हे; तर डोळ्यांशी संबंधित इतरही शस्त्रक्रिया बंद पडल्या. खूपच तातडीची शस्त्रक्रिया असल्यास दुसऱ्या विभागाच्या शस्त्रक्रिया विभागात केल्या जातात. परंतु यांची संख्या फार कमी आहे.

-डॉ. रवी चव्हाण

प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेयो

Web Title: Eye surgery stalled in Nagpur district; Darkness in front of 20,000 elders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य