आॅक्टोबरमध्ये अतिरिक्त पाणी
By Admin | Updated: July 12, 2014 02:23 IST2014-07-12T02:23:26+5:302014-07-12T02:23:26+5:30
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या पेंच- टप्पा ४ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आॅक्टोबरमध्ये अतिरिक्त पाणी
नागपूर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या पेंच- टप्पा ४ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. आॅक्टोबरमध्ये ही योजना पूर्ण होणार असून येथून नागपूरकरांना दररोज अतिरिक्त १२० दलघमी पाणीपुरवठा होईल. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल. सोबतच कालव्याद्वारे येणारे पाणी आता मोठ्या जलवाहिनीतून येणार असल्यामुळे वर्षाकाठी तब्बल ८ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसह कामठी- खैरी, घोगली येथे दौरा करून या प्रकल्पाची पाहणी केली. पेंच जलाशय ते महादुलापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी २३०० मी.मी.ची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. २७.३१ किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी २६.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. फक्त घोगली गावामध्ये ८०० मीटरे प्रलंबित आहे. येथील शेतकऱ्यांशी न्यायालयीन स्तरावर तडजोड सुरू असून १५ दिवसात मार्ग निघण्याची शक्यता आहे. उर्वरित काम फक्त ५ ते ७ टक्के उरले आहे. हे काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असा दावा कोहळे यांनी केला. दौऱ्यात कार्यकारी अभियंता शाम चव्हाण, अभियंता सुरेश भजे उपस्थित होते.
इंटेकवेलचे काम पूर्ण
६३० एमएलडीची क्षमता विचारात घेत कामठी-खैरी येथे इंटेकवेल उभारण्यात आली आहे. २२०० मि.मी. व्यासाच्या सिमेंटच्या दोन जलवाहिनी पंपहाऊसपर्यंत टाकण्यात आल्या आहेत.
भविष्यातही आंतरग्राही विहिरीमध्ये दुरुस्ती निघाल्यास तिथपर्यंत पोहचण्यासाठी पोहचपूल बांधण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पंपहाऊसमध्ये आठ पंप
इंटेकवेलमध्ये येणारे पाणी पंपहाऊसमध्ये तयार करण्यात आलेल्या साठवणूक टाकीत जमा होईल. त्याला दोन भागात विभागण्यात आले असून एका भागाची स्वच्छता करताना दुसऱ्या भागातून अखंडित पाणीपुरवठा करता येईल. या ठिकाणी आठ पंप उभारण्यात आले आहेत. सहा पंप सतत कार्यरत राहतील. दोन पंप राखीव ठेवले जातील. दोन महिन्यात उरलेली कामे पूर्ण होतील.
प्रकल्पाला विलंब
या प्रकल्पाचे काम सुमारे तीन वर्षे विलंबाने होत आहे. जून २०१४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, अद्याप बरीच कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे खर्चात सुमारे २७ कोटींची वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले, असे कोहळे यांनी सांगितले.