स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:35 IST2019-10-25T23:32:52+5:302019-10-25T23:35:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा ...

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा सगळ्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडल्यागत स्थिती सध्याची आहे. ज्या सत्तेविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले, तीच सत्ता अर्थात लंडन सावरकरांचा भारतीय देशभक्त आणि महान तत्त्वचिंतक म्हणून गौरव करते. आपल्याकडे मात्र, त्याच सावरकरांची बदनामी केली जाते. अशा सावरकरांना भारतरत्न देणार की नाही, हे भारत सरकारने स्पष्ट करावे.. असे आवाहन प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. विक्रम संपथ यांनी केले.
मंथन ऑर्गनायझेशनच्यावतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘वीर सावरकर : विस्मृतीत केलेल्या भूतकाळाचा प्रतिध्वनी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तेथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती एक भारतीय देशभक्त आणि महान चिंतक म्हणून जपली जात आहे. मात्र, आपल्याकडे आमच्याच महान पुरुषांचा प्रत्येक व्यासपीठावर अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेत अगदी सुरुवातीपासूनच महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांचा तिटकारा दिसतो. त्यामुळेच, नव्या पिढीला सावरकर माहीत नाहीत. सावरकर हे पूर्ण स्वातंत्र्याबद्दल बोलणारे पहिले भारतीय होत. ‘सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय’ ही घोषणा त्यांचीच होती. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर कधीच विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानच्या स्थापनेला कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्सद्वारे प्रेरित नाहीत. मात्र, त्यांच्याविषयी भ्रम पसरविण्यात येत असल्याचे डॉ. विक्रम संपथ म्हणाले. डॉ. विक्रम संपथ यांचे श्रीधर गाडगे यांनी स्वागत केले. रसिका जोशी व सागर मिटकरी यांनी संचालन केले तर आभार ऋषिकेश वानोडे यांनी मानले.