जनतेला कूटनीती नव्हे, निर्णयांची अपेक्षा
By Admin | Updated: February 7, 2015 02:01 IST2015-02-07T02:01:34+5:302015-02-07T02:01:34+5:30
लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो.

जनतेला कूटनीती नव्हे, निर्णयांची अपेक्षा
नागपूर : लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो. त्यांना हवे असतात विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय. त्यामुळे लोकशाही पद्धतीत वेगाने निर्णय होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘जी. एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट अॅन्ड रिसर्च’तर्फे आयोजित तिसऱ्या ‘नॅशनल एचआर कॉन्क्लेव्ह’चे शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे उद्घाटन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.
‘द चेंजीग डायनामिक्स आॅफ एच आर’ या विषयावर केंद्रित असलेल्या या ‘कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक हर्ष चोप्रा, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी व संचालक डॉ.रवींद्र अहेर हे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्यामध्ये आत्मविश्वास जरूर असावा परंतु अहंकार नको. त्यामुळे माणसे दुरावतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे. दृष्टिकोनातून मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कळून येते. ‘एचआर‘चे काम म्हणजे संस्थेमध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी असते. सहकार्य, संवाद आणि समन्वय जर योग्य असेल तर यश तर मिळतेच. शिवाय मनुष्यबळामध्ये उत्साहदेखील निर्माण करता येतो. तसेच संस्थेत खेळीमेळीचे वातावरण राहते, असे गडकरी म्हणाले.
यावेळी हर्ष चोप्रा यांनी उपस्थितांना भारतातील उद्योगाला भरारी देण्यासाठी कसली आवश्यकता आहे यावर मार्गदर्शन केले. पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना उद्योगजगताच्या दृष्टीने चांगली आहे. जगातील अनेक देश उद्योगाच्या बाबतीत भारताच्या समोर आहेत. आपल्याकडे उद्योग स्थापन करण्यासाठी कायद्याची बंधने आहेत व येथे उद्योग स्थापन करणे ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विदेशातून येथे उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपाद चोप्रा यांनी केले. ‘कॉन्क्लेव्ह’चे प्रास्ताविक सुनील रायसोनी यांनी केले. राजीव खुराणा, आर.एन.पटेल. डॉ.बी.आर.सिंह, संतोष पनिक्कर, गोपाल नायर, विजय देशपांडे, विहार राखुंडे, हर्षद पै, हिरेंद्र बढिये, राजेश जैन या तज्ज्ञांनी या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. बंगळुरू येथील उद्योजक डॉ.उषा मोहनदास यांच्या व्याख्यानाने या ‘कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. कार्यक्रमाचे संचालन संचालन शेफाली मनसाता यांनी केले. (प्रतिनिधी)