दिक्षाभूमीवर समता सैनिक दलाची कवायत; दोन हजार सैनिकांची सेवा
By सुमेध वाघमार | Updated: October 23, 2023 20:00 IST2023-10-23T20:00:20+5:302023-10-23T20:00:28+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे दोन हजारांवर सैनिक डोक्यावर निळी टोपी आणि हातात काठी घेऊन दीक्षाभूमीवर सज्ज झालेत.

दिक्षाभूमीवर समता सैनिक दलाची कवायत; दोन हजार सैनिकांची सेवा
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे दोन हजारांवर सैनिक डोक्यावर निळी टोपी आणि हातात काठी घेऊन दीक्षाभूमीवर सज्ज झालेत. सोमवारी दलाच्यावतिने दीक्षाभूमीच्या मैदानात कवायती करीत लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी ‘महाड’ला एक परिषद भरविली होती. या परिषदेत त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. याच समता सैनिक दलाच्या उपस्थितीत चवदार तळ्याचा सत्त्याग्रह , नाशिकचा सत्त्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा , १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येक वेळी समता सैनिक दलाने महत्वपूर्ण कामगिरी बजाविली. निळी टोपी, पांढरा शर्ट, खॉकी पॅण्ट आणि हातात काठी हा गणेवशधारी सैनिक दरवर्षी दीक्षाभूमीवरही आपली सेवा देतात. ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने सोमवारपासून या सैनिकांनी आपली जागा घेऊन सुरक्षेसाठी सज्ज झाले.
दिल्ली ते बिहार येथून येतात सैनिक
समता सैनिक दलाचे भदन्त नागदिपांकर यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्टÑीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत, प्रदीप डोंगरे यांच्या नेतृत्वात पृथ्वी मोटघरे, शिबिर प्रमुख राजकुमार वंजारी, उपप्रमुख सुरेखा टेंभूर्णे, आर. सी. फुल्लके, नागपूर जिल्हा प्रमुख प्रमोद खांडेकर, सचिव आकाश मोटघरे, व्यवस्थापक बी.एम. बागडे, नरहरी मोटघरे यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावली जात आहे. हे भीमसैनिक महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथून आले आहेत.
सुरक्षेसोबतच सेवाही
पृथ्वी मोटघरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, दीक्षाभूमीवर सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी कमी करण्याचे, आजारींना ‘हेल्थ कॅम्प’पर्यंत घेऊन जाण्याचे, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामही हे सैनिक करतात.