‘निकोटिन’च्या व्यसनापासून मुक्ती?
By Admin | Updated: August 6, 2014 01:17 IST2014-08-06T01:17:27+5:302014-08-06T01:17:27+5:30
युवापिढीमध्ये तंबाखू, सिगारेट यांच्या व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहे. सामान्यत: ‘निकोटिन’ या घटकामुळे ही चटक जास्त प्रमाणात वाढते. परंतु आता ‘निकोटिन’साठी

‘निकोटिन’च्या व्यसनापासून मुक्ती?
‘नीरी’च्या संशोधकांनी घडविले ‘स्मार्ट पॉलिमर’ : राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
नागपूर : युवापिढीमध्ये तंबाखू, सिगारेट यांच्या व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहे. सामान्यत: ‘निकोटिन’ या घटकामुळे ही चटक जास्त प्रमाणात वाढते. परंतु आता ‘निकोटिन’साठी होणाऱ्या व्यसनापासून मुक्ती मिळण्यासंदर्भात पावले उचलणे शक्य होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ‘नीरी’तील (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) संशोधक डॉ. रेड्डीथोटा कृपादम यांनी ‘स्मार्ट पॉलिमर’ तयार केले आहे. या ‘पॉलिमर’च्या माध्यमातून रक्त व ‘सिरम’मधील ‘निकोटिन’ची पातळी तर कळणारच आहे, शिवाय या नवनिर्मित ‘एमआयपी’च्या (मॉलिक्युलर इम्प्रिंटेट पॉलिमर्स) मदतीमुळे ‘निकोटिन’चे व्यसन सोडविण्यासाठी उपचारपद्धती विकसित करणे शक्य होणार आहे. डॉ. कृपादम यांच्या या कार्याचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
साधारणत: धूम्रपानाची चटक ‘निकोटिन’ या घटकामुळे लागते. ‘निकोटिन’ची एक ठराविक पातळी रक्तात पोहोचल्यावर ती मेंदूपर्यंत पोहोचते व तेथील काही विशिष्ट रासायनिक क्रियांमुळे मेंदू काही काळ उत्तेजित होतो. ही उत्तेजना कमी झाली की या व्यक्तीला तंबाखूचा तेवढा डोज हवासा वाटतो. अशारीतीने ‘निकोटिन’ची ठराविक पातळी सतत मेंदूच्या संपर्कात राहण्यासाठी दरवेळी त्या व्यक्तीस तंबाखूच्या वाढत्या डोजचा आधार घ्यायला लागतो. तंबाखू, सिगारेटच्या माध्यमातून होणाऱ्या ‘निकोटिन’च्या व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी कृत्रिम ‘रिसेप्टर्स’ तयार करण्याचे आव्हान डॉ. कृपादमांसमोर होते. यासंदर्भात अथक संशोधनानंतर त्यांनी ‘एमआयपी’चा शोध लावला.
यासंदर्भातील विश्लेषण ‘मॉलिक्युलर इम्प्रिंटिंग’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये छापून आले. हे ‘एमआयपी’ ‘निकोटिन’साठी ‘सिंथेटिक रिसेप्टर्स’चे काम करतात. यांच्या माध्यमातून रक्त आणि सिरम यांचे वैद्यकीय निदान करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)