खळबळजनक! कैद्यासोबत पोलिसांनी दारू ढोसून रुग्णालयातील वॉर्डात घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 20:17 IST2023-06-01T20:16:38+5:302023-06-01T20:17:15+5:30
Nagpur News तपासणीसाठी आणलेल्या कैद्याला पोलिसांनी बाहेर नेऊन त्याच्यासोबत दारू पिऊन पुन्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातल्याची घटना येथे घडली.

खळबळजनक! कैद्यासोबत पोलिसांनी दारू ढोसून रुग्णालयातील वॉर्डात घातला गोंधळ
नागपूर : मेडिकलमध्ये भरती असलेल्या एका कैद्याला दोन पोलिसांनी ‘एमआरआय’ करण्याच्या बहाण्याने रुग्णालयाबाहेर नेले. त्यांनी बाहेरच जेवण केले आणि सोबत दारूही प्यायले. नंतर वॉर्डात येऊन तिघांनी गोंधळ घातला. या प्रकरणाने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत वरीष्ठ पोलिसांना याची माहिती दिली. परंतु पोलिसांत तक्रार केली नाही. यामुळे कोणाला वाचविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
चंद्रपूर मेडिकलच्या कारागृहातील एक २३ वर्षीय कैदीवर चंद्रपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. मेंदूवरील उपचारावरील सल्ला घेण्यासाठी संबंधित कैद्याला दोन पोलिसांसोबत नागपूर मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३६ मध्ये त्याचावर उपचार सुरू होते. या वॉर्डात कैद्यांसाठी सहा खाटा राखीव आहेत. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला कैदी आणि दोन पोलिसांनी ‘एमआरआय’ करून येतो असे सांगितले. परंतु ते मेडिकलच्या एमआरआय विभागात न जाता रुग्णालयाबाहेर गेले. रात्री १० वाजताच्या सुमारास कैदी व दोन्ही पोलीस बाहेर जेवण करून आणि दारू पिवून वॉर्डात आले. त्यांनी वॉर्डात गोंधळ घालायला सुरुवात केली. याची माहिती वॉर्डातील परिचारिकेने ‘कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर’ला (सीएमओ) दिली.