कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला अधिक सजग राहावे लागणार आहे. शाळेत कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी प्रत्येकाचे प्रबोधन आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर कोरोनाचे संक्रमण टाळण्यात महत्त्वाची भूमिका वठवितात. ही सवय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंगवळणी पाडून देण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. ग्रामीण भागात आजही अनेक गावात मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.
कामठी तालुक्यातील महादुला व कोराडी परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळात १० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ९०० पैकी २०० विद्यार्थी तर सरस्वती भवन्स कॉन्व्हेंटमध्ये १४२ पैकी ६०, प्रागतिक विद्यालयात ९४० पैकी ६० विद्यार्थी, विद्यामंदिर हायस्कूल येथे ६६७ पैकी ७२ विद्यार्थी, पद्मश्री स्मिता पाटील विद्यालयात ९१ पैकी १२ विद्यार्थी, तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७७७ पैकी १२३, सेवानंद विद्यालयात १४७ पैकी १५ तर भांगे पब्लिक स्कूलमध्ये ५७ पैकी १० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली. केसरीमल पालीवाल विद्यालयात मुख्याध्यापिका प्रभावती कोलते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे व त्यांच्या चमूने तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यासोबतच मौदा तालुक्यातील अरोली येथील समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक त्या उपाययोजना करीत वर्ग सुरू करण्यात आले. प्राचार्या नंदा कुंभलकर, संस्थाध्यक्ष शिवाजीराव कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना केल्या.
न.प. शाळाही दक्ष
कळमेश्वर तालुक्यात नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला आजपासून सुरुवात झाली. सोमवारी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. उद्या इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले आहे. येथे दिवसाआड दोन वर्ग राहणार आहे. या शाळेतील दहावीतील २५६ विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी उपस्थित होते तर बारावीच्या २२९ पैकी ७७ विद्यार्थी उपस्थित होते.