माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार
By आनंद डेकाटे | Updated: July 20, 2023 13:07 IST2023-07-20T13:05:48+5:302023-07-20T13:07:15+5:30
आंध्र विद्यापीठ व केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्यात करार : कला शाखेतील बी.ए. पदवी मिळणार

माजी सैनिकांना शिक्षणात सुवर्णसंधी, बी.ए.ची पदवी मिळणार
नागपूर : केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यामध्ये कला शाखेतून बी.ए. (एच.आर.एम.) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याच्या मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नौकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे.
माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. त्यामुळे आंध्र विद्यापीठाशी झालेल्या कराराद्वारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापीठाद्वारे कला शाखेतून बीए(आयआयआरएम) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंधीचा इच्छुक माजी सैनिकांनी लाभ घ्यावा.
माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी याप्रमाणे आहे. अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स द्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. १ जानेवारी २०१० नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना पाच वर्षांचा अभ्यासक्रम (२ वर्ष बारावी ३ वर्ष पदवी) लागू राहील.
अभ्यासक्रमाची कोर्स फी रुपये १२,५०० असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars/publications पहावे किंवा सबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.