कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्यासाठी केंद्र सरकारने डेडलाईन दिलेली आहे. त्यांना भारत देश सोडावाच लागेल. जो आश्रय या देशात मिळतो तो मिळू नये. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे चालणार नाही. जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढली पाहिजे, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे भारताला मान्य नाही, म्हणून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान के लोक चले जाव ची भूमिका घेतली ती योग्य आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
बावनकुळे शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांनी अशी वक्तव्य करू नये. ज्यांच्या घरी जीव गेला त्यांच्याशी भेट घ्यावी. एवढा मोठा राष्ट्रावर आघात झाला आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या कुटुंबाला काय विचारलं, हे पहावं, एकातरी कुटुंबियांशी शरद पवार हे भेटले आहेत का, त्यांना विचारले का काय झाले म्हणून, मतांच्या लांगूलचालनाकरिता शरद पवारांनी अशी वक्तव्य करू नये, असे परखड मत बावनकुळे यांनी मांडले.
राज-उद्धव युतीचा आम्हाला काही प्रश्न नाहीराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर त्यांची युती केली, तर तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची माफी मागावीराहुल गांधी जेव्हा सावरकरांविषयी बोलतात त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला. आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारतात. आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर राहुल गांधींचे डोकं ठिकाणावर आले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय, हे त्यांना कळले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
महामंडळ व समित्यांवर दोन महिन्यात नियुक्त्याया महिन्यात आमचे जिल्हाध्यक्ष, १२८० मंडळ घटित होतील. राज्य सरकारचे १०८ महामंडळ, ७६५ अशासकीय सदस्य, वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी यावर महायुतीतील तीन ते पाच हजार कार्यकर्ते मे व जून या दोन महिन्यात विविध पदावर येऊ शकतात यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी एकत्र बसून या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने करणार आहोत.