अखेर संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:28+5:302021-02-18T04:14:28+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा पाचनवरी येथील बाजारगाव पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी पेपर मिललगतच्या संरक्षित वनभूमीवर ...

अखेर संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात
कळमेश्वर : कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा पाचनवरी येथील बाजारगाव पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी पेपर मिललगतच्या संरक्षित वनभूमीवर केलेले अतिक्रमण हटविण्यासंबंधी काटोल उपविभागीय वनअधिकारी प्रज्योत पालवे यांनी पारित केलेल्या आदेशानुसार अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संबंधित पेपर मिलने अतिक्रमण हटविण्यास विलंब लावल्यास वनविभाग स्वत: अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणार, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर यांनी दिली.
नागपूर-अमरावती महामार्गावरील पाचनवरी या भागातील बाजारगाव पेपर व पल्प मिल संचालकाकडून मिललगतच्या संरक्षित वनविभागाच्या वन कक्ष क्रमांक १४८ पाचनवरी (भूमापन सर्व्हे क्रमांक ३१ व ४६/ बंदोबस्त गट क्रमांक २१/१ व २१/२) क्षेत्र १.०९ हेक्टर आरमध्ये अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा वन विभागाकडून ही अतिक्रमित जागा मोकळी करण्यासंबंधी २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५३, ५४ व ५४ (अ)च्या तरतुदीनुसार अनेकदा सूचना मिल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. परंतु मिल प्रशासनाने वनविभागाला कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने अतिक्रमित जागेची शासकीय नियमानुसार मोजणी करून पेपर मिलचे संचालक व सुपरवायझर यांचे बयान नोंदविण्यात आले. तसेच पेपर मिल संचालक ही जागा त्यांच्या मालकीची आहे हे सिद्ध करू न शकल्याने काटोलचे उपविभागीय वनअधिकारी प्रज्योत पालवे यांनी बाजारगाव पेपर व पल्प मिलकडून अतिक्रमित संरक्षित वनजमीन रिकामी करावी, असा आदेश बजावला. सध्या पेपर मिल प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यासंबंधी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
-
बाजारगाव पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा दिवसाच्या आत अतिक्रमण हटविण्यासंबंधी नोटीस देण्यात आली आहे. परंतु सदर कंपनी प्रशासनाकडून अत्यल्प मनुष्यबळ व वेळकाढू धोरण वापरून अतिक्रमण हटविणे सुरू आहे. यामुळे कंपनी प्रशासनाने दिलेल्या अवधीत अतिक्रमण हटविले नाही तर वन विभाग स्वत: वनभूमीवरील अतिक्रमण हटविण्यासंबंधी कारवाई करणार आहे.
- अर्चना नौकरकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, कळमेश्वर