अनाथ असली, दृष्टी नसली तरी अंधारमय आयुष्यात तीने लावला दिवा ! मालाच्या यशाने जिल्हाधिकारीही गेले भारावून
By आनंद डेकाटे | Updated: October 6, 2025 20:33 IST2025-10-06T15:24:54+5:302025-10-06T20:33:19+5:30
माणुसकीने भरलेला दिवस : माला शंकरबाबा पापळकर जिल्हाधिकारी कार्यालयात रूजू

Even though she was an orphan and blind, he lit a lamp in a dark life; The District Collector was also overwhelmed by the success of the product
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाव- माला शंकरबाबा पापळकर. ती जन्मत: दृष्टिहीन अन् अनाथ. जळगावात कचराकुंडीतून उचलून आणलेले ते रोपटे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अनाथाश्रमात रूजविले, संगोपन केले. ब्रेल लिपी व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ती राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. सोमवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रूजू झालेल्या मालाचे असे देवदुर्लभ स्वागत झाले की, तिच्यासारख्या हजारो, लाखो अनाथ. निराधार तरूण-तरूणींच्या मनांमध्ये प्रेरणेचे दीप उजळून निघावेत.
एरव्ही रूक्ष सरकारी कोंदटपणा अनुभवणाऱ्या जिल्हा कचेरीत सोमवारची सकाळ आगळीवेगळी होती. स्वत: शंकरबाबा आणि वझ्झर आश्रमातील त्यांची मुले-मुली आनंदी चेहऱ्याने मालाच्या कर्तबगारीचे साक्षीदार बनण्यासाठी उपस्थित होते. या सर्वांच्या स्वागताला जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे व इतर सज्ज होते. खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सायंकाळी तिची भेट घेऊन मालाच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र शासनाने शनिवारी, 4 ऑक्टोबरला अनुकंपा व सरळसेवा भरतीद्वारे नागपूरमधील ९४१ उमेदवारांसह राज्यभरातील 10 हजार 309 उमेदवारांना शासन सेवेतील नियुक्तीचे आदेश दिले. महसूल सहाय्यक माला पापळकर ही त्यापैकी एक. तिच्या रूजू होण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय जणू भावविभोर झाले होते. पापळकर यांच्या संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने, सौ. प्राप्ती माने, रोटरी क्लबचे पदाधिकारी व विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालाला दिल्या अनोख्या शुभेच्छा
राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत माला पापळकरच्या जागेवर जाऊन तिला शुभेच्छा दिल्या. ‘तुझ्यामधे असलेल्या सुप्त गुणांना ओळखून कामाची जबाबदारी देवू’ असे त्यांनी सांगून तिच्या मनोबलाला उंचावले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर होते.
"आजचा दिवस सर्व अनाथ, दिव्यांग व्यक्तीचा मनात आत्मविश्वास निर्माण करणारा असून आमची ‘माला’ जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होतांना पाहून मन भरुन आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा व सरळसेवा भरती प्रक्रियेला गती दिल्याने हे साध्य झाले."
- पद्मश्री शंकरबाबा पापळकर, सामाजिक कार्यकर्ते
"जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आजचा दिवस आगळावेगळा ठरला. अनेक आव्हानांवर मात करुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेवर उभी राहिलेली माला ही खऱ्या अर्थाने युवकांची प्रेरणा व्हावी."
- डाॅ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर
"बाबांनी माझे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. परतवाडा येथून पदवी मिळविल्यानंतर मला ब्रेल लिपीतून उच्च तंत्रज्ञानाचा अविष्कार ठरलेल्या ऑनलाईन क्लासेसचा खूप फायदा झाला. स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वासाने यश मिळविले. आता शासकीय सेवेत मिळेल ती जबाबदारी पार पाडीन."
- माला पापळकर, महसूल सहाय्यक