जरीपटक्यात हत्या
By Admin | Updated: January 18, 2015 00:51 IST2015-01-18T00:51:44+5:302015-01-18T00:51:44+5:30
जरीपटक्यातील बाबादीपसिंग नगरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रमेश रावजी देशभ्रतार (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर

जरीपटक्यात हत्या
गळा दाबला : जादुटोण्यावरून घटना घडल्याचा संशय
नागपूर : जरीपटक्यातील बाबादीपसिंग नगरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रमेश रावजी देशभ्रतार (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) शिपायी (चपराशी) म्हणून सेवारत होते. जादुटोण्यातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पागलखाना चौकाजवळच्या एनएडीटी क्वॉर्टर नं. ११ मध्ये ते राहात होते. बाबादीपसिंग नगरात त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले. आज सकाळी ९ वाजता बांधकामावर आलेल्या एका मजूर महिलेला ते गच्चीवर पडून दिसले. झोपून असावे, असे समजून तिने त्यांना आवाज दिले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने अन्य मजुरांना सांगितले. त्यांनी नंतर घरच्यांना आणि पोलिसांना कळविले. माहिती कळताच जरीपटक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांना मारहाण केल्यानंतर गळा दाबून मारल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. मृतदेह रुग्णालयात पाठविल्यानंतर डॉक्टरांनीही तसाच अहवाल दिला. तोंडावर आणि गळ्यावर मारहाण केल्यामुळे देशभ्रतार यांचा एक दात पडला. हत्येनंतर देशभ्रतार यांचा मोबाईल, एटीएम कार्ड, सोने आणि चांदीची प्रत्येकी एक अंगठी आरोपीने लंपास केली. पोलिसांनी हत्या व लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
ड्युटी नंतर दरबार
पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश देशभ्रतार ड्युटी संपल्यानंतर ‘दरबार‘ भरवायचे. आठवड्यातून विशिष्ट दिवशी दरबारात आलेल्यांना लिंबू, गंडेदोरे, राख आणि औषधे द्यायचे. त्यासाठी त्यांनी एक विशेष रूम तयार केली होती. यात विविध देवदेवतांचे फोटो लावले आहेत. काचेची दानपेटी आणि अंगारा (राख) भरलेला मोठा डबा, तसेच काही ‘शक्तिवर्धक औषधेही पोलिसांना आढळली. ते सर्व जप्त करण्यात आले.
धुपारे घेणारानेच दाखवले काम ?
रमेश देशभ्रतार यांची हत्या त्यांच्या दरबारात येणाऱ्यापैकीच कुणी ‘पीडिताने‘ केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. गंडादोरा तसेच अंगारा धुपारा करून असाध्य आजार बरा करण्याचा आणि पुत्रप्राप्तीचा दावा देशभ्रतार करीत होते. लाभ न झालेल्या किंवा त्यातून वाद झाल्यामुळेच एखाद्या पीडिताने त्यांची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.